न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण खंडपीठ कार्यरत; प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्याचा निर्धार.
नाशिक, (विशेष प्रतिनिधी) –नाशिक विभागातील पोलीस दलात खळबळ उडवणारी आकडेवारी समोर आली आहे. पोलीस शिपायापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तब्बल १११२ तक्रारींचा पाऊस पडल्याने सामान्य नागरिकांच्या मनात पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाखल झालेल्या या विक्रमी प्रकरणांमुळे खाकी वर्दीच्या विश्वासार्हतेलाच आव्हान मिळाले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार स्थापन झालेल्या नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे २०१८ पासून तक्रारींचा ओघ सुरू आहे. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीविरोधात दाद मागण्यासाठी हे प्राधिकरण म्हणजे नागरिकांसाठी एक मोठे शस्त्र ठरले आहे.
या गंभीर प्रकरणांची दखल घेण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने न्याय देण्यासाठी आता सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. अशोक अंबादास भटकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या खंडपीठात सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने आणि नागरी समाजाचे प्रतिष्ठित प्रतिनिधी श्री. अमित डमाळे यांचा समावेश असल्याने, तक्रारींची निःपक्षपातीपणे आणि सखोल चौकशी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आकडेवारी बोलतेय!
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १११२ प्रकरणांपैकी ६९७ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. मात्र, अजूनही मोठी प्रकरणे प्रलंबित असल्याने तक्रारदारांचे डोळे न्यायाकडे लागले आहेत. ऑक्टोबर २०२४ पासून पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेल्या खंडपीठामुळे आता तपासाला वेग येणार असून, दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राधिकरणाचे सदस्य सचिव, श्री. संदीप मिटके यांनी सांगितले की, “प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी प्राधिकरण कटिबद्ध आहे आणि आम्ही त्या दिशेने वेगाने काम करत आहोत.”
एकीकडे पोलीस दलावरील कामाचा ताण आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात वाढत्या तक्रारी, या पार्श्वभूमीवर हे प्राधिकरण सामान्य जनतेसाठी आशेचा किरण ठरणार का, आणि खाकी वर्दीतील ‘वाईट प्रवृत्तींना’ चाप बसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







