पोलिसांच्या नावाचा वापर करून २१ लाखांचा गंडा! नाशिक सायबर पोलिसांचे भामट्यांना खुले आव्हान, “पाताळातूनही शोधून काढू!”

मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत उकळली रक्कम. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे तपासाची धुरा, आरोपींच्या मुसक्या आवळणारच!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १२:- सप्टेंबर:शहरात एका हाय-प्रोफाईल सायबर फसवणुकीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांचे नाव वापरून सायबर भामट्यांनी एका नागरिकाला तब्बल २१ लाख १३ हजार २३६ रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर नाशिक शहर पोलीस दल खडबडून जागे झाले असून, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. “आरोपी कोणीही असोत, त्यांना पाताळातूनही शोधून काढू आणि त्यांच्या मुसक्या आवळू,” असा थेट इशाराच नाशिक पोलिसांनी या सायबर गुन्हेगारांना दिला आहे.

फिर्यादी व्यक्तीला +91 9088136785 आणि +91 7708658086 या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला. फोनवरील व्यक्तीने आपण संदीप रॉय, पोलीस सब-इन्स्पेक्टर, कुलाबा पोलीस स्टेशन, मुंबई येथून बोलत असल्याचे भासवले. त्याने फिर्यादीच्या नावाने कॅनरा बँकेत एक क्रेडिट कार्ड बनवले गेले असून, त्याचा वापर मनी लॉण्ड्रिंगसाठी झाल्याची भीती घातली. या प्रकरणात तुमचाही सहभाग असल्याचा बनाव रचून, फिर्यादीवर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला.

“तुमची सर्व बँक खाती आणि स्थावर मालमत्तेची माहिती तात्काळ द्यावी लागेल, अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई होईल,” अशी धमकी देऊन भामट्यांनी फिर्यादीला पूर्णपणे घाबरवून सोडले. फिर्यादी व्यक्ती भीतीच्या छायेत असताना, त्यांच्या बँक खात्यातील रक्कम आम्ही सांगतो त्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले. दिनांक १६ जुलै ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही रक्कम उकळण्यात आली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांच्या परवानगीने तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हेगारीतील निष्णात अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  उमेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

श्री. पाटील आणि त्यांच्या टीमने गुन्हा दाखल होताच आरोपींचे मोबाईल क्रमांक आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग झाले आहेत, त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केली आहे. “आम्ही गुन्हेगारांच्या मुळापर्यंत पोहोचणार आहोत. हे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता असून, आमची पथके त्या दिशेने कामाला लागली आहेत. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आम्ही सार्थ ठरवू,” असा विश्वास वपोनि उमेश पाटील यांनी व्यक्त केला.

नाशिक शहर सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस अधिकारी कधीही फोनवर तुमच्याकडून बँक तपशील, OTP किंवा मालमत्तेची माहिती मागत नाहीत.

 फोनवर कोणी पोलीस असल्याची बतावणी करत असल्यास, घाबरून न जाता जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा किंवा 1930 या सायबर हेल्पलाइनवर कॉल करा.

 अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणत्याही बँक खात्यात पैसे वर्ग करू नका.

 धमकी किंवा दबावाखाली कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. सतर्क राहा, सुरक्षित राहा

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!