अंमली पदार्थ विरोधी पथकाची थरारक कारवाई; नाशिकच्या ड्रग्ज रॅकेटला मोठा हादरा!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१५:-संपूर्ण वर्षभर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार किरण साळुंके आणि त्याची साथीदार ‘टिना’ उर्फ दिपाली पाटील यांच्या अखेर नाशिक शहर पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या ‘वॉन्टेड’ आरोपींना शोधून काढण्याच्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका थरारक कारवाईत या दोघांनाही गजाआड केले आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या वर्षभरापासून इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात हे दोघेही पोलिसांना चकवा देत होते. मात्र, ‘कायद्याचे हात लांब असतात’ याची प्रचिती देत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना त्यांच्या गुप्त खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली. माहिती मिळताच, कोल्हे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या धाडसी पथकाला कारवाईसाठी सज्ज केले.
माहितीनुसार, कुख्यात किरण साळुंके हा सिडकोतील पवननगर येथील भगतसिंग चौकातील आपल्या घरी येणार होता. त्यानुसार, पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच किरणने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरवला. क्षणार्धात पथकाने त्याला झडप घालून ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा किरणची साथीदार आणि या गुन्ह्यातील महत्त्वाची आरोपी दिपाली पाटील उर्फ टिना हिच्या सिडकोतील अवंती लॅन्डमार्क अपार्टमेंटमधील घरी वळवला. तिथेही पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत दिपालीला घरातून अटक केली.
किरण साळुंके आहे सराईत गुन्हेगार!
अटक करण्यात आलेला आरोपी किरण साळुंके हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही दरोडा, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक धोकादायक गुन्हेगार मानला जातो. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सुशिला कोल्हे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या पथकात सपोनि सचिन चौधरी, सपोनि विशाल पाटील यांच्यासह ताजणे, गायकर, बेंडाळे, डंबाळे, कोल्हे, सौंदाणे, नांद्रे, सानप, बागडे, वडजे आणि फुलपगारे या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून या ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या धाडसी कारवाईमुळे नाशिककरांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.







