गुन्हेगारी विरोधातील धडक मोहिमेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद; शहरात सर्वत्र समर्थनाचे फलक, पोलीस दल झाले भावूक !
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २७ ऑक्टोबर २०२५:नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाने गुन्हेगारांविरोधात उघडलेल्या धडक मोहिमेला नाशिककरांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिला आहे की, अखेर खुद्द पोलीस दलालाच ‘तुमचे हे प्रेम आता आवरते घ्या’ असे भावनिक आवाहन करावे लागले आहे. शहरात टवाळखोर आणि गुंडांच्या मुसक्या आवळल्याने खुश झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरबाजीचा अक्षरशः महापूर आला असून, या ‘प्रेमाच्या वर्षावाने’ भारावून गेलेल्या पोलीस दलाने आता हे फलक काढण्याची विनंती केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. टवाळखोर, रोड-रोमियो, गुंड आणि अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा धडाका लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे आणि सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलिसांच्या समर्थनार्थ शहरात बॅनर आणि होर्डिंग्ज लावले. “नाशिक पोलीस – आमचा अभिमान!”, “REAL HEROES IN KHAKI” अशा घोषणांनी शहर अक्षरशः दुमदुमून गेले.
प्रेमाने भारावले, पण कर्तव्याचे भान!
जनतेकडून मिळालेला हा पाठिंबा आणि प्रेम पाहून संपूर्ण पोलीस दल भारावून गेले आहे. जनतेची ही सकारात्मक दखल आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर आज नाशिक शहर पोलीस दलाने एक प्रसिद्धीपत्रक काढून या सर्व नागरिकांचे आणि संघटनांचे आभार मानले आहेत.
“तुमच्या या सकारात्मक भावनांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” असे म्हणत पोलिसांनी एक आगळीवेगळी विनंती केली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “आपणांस विनंती आहे की, सदरचे फलक / बॅनर्स संबंधित नागरिक, संघटना यांनी आता काढून घ्यावेत.”
कर्तव्यपूर्ती हेच आमचे बक्षीस आहे, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, अशा आशयाची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. एकीकडे पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असताना, दुसरीकडे नागरिकांच्या या प्रेमाने पोलीस दल भारावून गेले आहे. हे एक दुर्मिळ आणि सकारात्मक चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.







