कलम की बंदूक? ‘प्रहार’च्या संपादकाला रोलेट माफियांची थेट धमकी! शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; मायकल खरात यांच्या निर्भीड भूमिकेला नाशिककरांचा सलाम!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२:-विशेष प्रतिनिधी:नाशिक शहरातील अवैध धंद्यांचे साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कंबर कसली असताना, दुसरीकडे जेलरोड परिसरात फोफावलेल्या ‘रोलेट किंग’च्या साम्राज्याला उघडं पाडणाऱ्या ‘प्रहार आवाज जनतेचा’ या वृत्तपत्राचे संपादक मायकल खरात यांना थेट ‘बंदोबस्त’ करण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनेकांची कुटुंबं रस्त्यावर आणणाऱ्या या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? आणि जर नसेल, तर सत्याच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पत्रकाराला संपवण्याची भाषा करणाऱ्या गुन्हेगारांची मजल इथपर्यंत जातेच कशी? असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत.

शहरातील अवैध धंद्यांवर नाशिक पोलीस कारवाईचा बडगा उगारत असताना जेलरोडमधील एक ‘रोलेट किंग’ मात्र बिनदिक्कतपणे आपला काळा बाजार चालवत होता. राजकीय वरदहस्त आणि पैशाच्या जोरावर त्याने संपूर्ण यंत्रणेलाच आव्हान दिले होते. याच ‘रोलेट किंग’च्या काळ्या धंद्यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत असल्याची धक्कादायक बातमी संपादक मायकल खरात यांनी ‘प्रहार आवाज जनतेचा’ मधून प्रसिद्ध केली. या बातमीने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने आणि आपले पितळ उघडे पडल्याने संतापलेल्या या रोलेट माफियांनी थेट बातमी लावणाऱ्या पत्रकाराचाच ‘बंदोबस्त’ करण्याचा फतवा काढला.

धमकीला बाणेदार उत्तर, कर्तव्यापासून मागे हटणार नाही!

या धमकी सत्रानंतर खचून न जाता संपादक मायकल खरात यांनी अधिक बाणेदार भूमिका घेतली आहे. “गौरी लंकेश आणि जे.डें. सारख्या अनेक पत्रकारांचे बळी गेले, पण पत्रकारिता कधी थांबली नाही आणि थांबणारही नाही. आम्ही आमच्या जीवाची भीक कुणाकडेही मागणार नाही. जे संकट येईल, त्याला सामोरे जाऊ, पण समाजाला पोखरणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात आमची लेखणी थांबणार नाही. आमचा एक बळी गेला तरी चालेल, पण आम्ही आमच्या कर्तव्यापासून तसूभरही मागे हटणार नाही,” या शब्दांत त्यांनी आपला निश्चय व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्भीड भूमिकेचे शहरातील सुजाण नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पोलीस आयुक्तांपुढे मोठे आव्हान!

एकीकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक शहराला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. त्यांनी आपल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली आहे. मात्र, त्याचवेळी त्यांच्याच हद्दीत एक पत्रकार समाजाच्या भल्यासाठी आवाज उठवतो आणि त्याला संपवण्याची धमकी दिली जाते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही धमकी केवळ मायकल खरात यांना नसून, ती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेला दिलेले थेट आव्हान आहे.

आता नाशिक पोलीस या धमकीची गांभीर्याने दखल घेणार का? पत्रकाराला संरक्षण देऊन रोलेट किंगच्या मुसक्या आवळणार का? की गुन्हेगारांपुढे पोलीस यंत्रणा हतबल आहे, असा संदेश समाजात जाऊ देणार? याकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे. सत्यासाठी लढणाऱ्या एका पत्रकाराच्या पाठीशी पोलीस प्रशासन खंबीरपणे उभे राहते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!