पंचवटीत चोरांचा महाधुमाकूळ: सोनं-रोकडसोबत तांदळाची पोतीही लंपास!

एकाच रात्रीत गोडाऊन, फ्लॅट आणि क्लिनिक फोडले; सव्वा लाखांचा ऐवज चोरीला, पोलिसांपुढे आव्हान

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १९:- (आमच्या प्रतिनिधीकडून): शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना पंचवटी परिसरात उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना जणू खुले आव्हान देत एकाच रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी घरफोडी करून तब्बल १ लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे, या चोरीत चोरट्यांनी सोनं-चांदी आणि रोकडसोबत चक्क तांदळाची पोतीही पळवून नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी धान्य व्यावसायिक पुंडलिक पांडुरंग कालेकर (वय ४०, रा. विद्यानगर, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१(३) आणि ३३१ (४) नुसार गुन्हा (गुरनं ३९५/२०२५) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑगस्टच्या सायंकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपली मोहीम राबवली.

चोरीचा थरार, जसाच्या तसा...

1. धान्याच्या गोडाऊनवर डल्ला: सर्वप्रथम चोरट्यांनी हमालवाडी, दत्तनगर येथील फिर्यादी पुंडलिक कालेकर यांच्या मालकीचे धान्याचे गोडाऊन लक्ष्य केले. गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल ३८,२०० रुपये किमतीची जिरा राईस आणि बासमती तांदळाची एकूण ३० पोती चोरून नेली. चोरट्यांनी अन्नधान्यावरही डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

2. बंद फ्लॅटमध्ये लूट: एवढ्यावरच न थांबता, चोरट्यांनी आपला मोर्चा धनेश्वरी अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटकडे वळवला. येथील फ्लॅट क्रमांक ५ चे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटातील ४५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (कानातील रिंगा आणि अंगठी) व १०,००० रुपयांची रोकड असा एकूण ५५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

3. डॉक्टरांचे क्लिनिकही सोडले नाही: चोरट्यांची हिंमत इतकी वाढली होती की, त्यांनी याच परिसरातील गुरुमाउली सोसायटीमधील डॉ. हेमंत चंद्रात्रे यांचे ‘चैतन्य क्लिनिक’ देखील फोडले. क्लिनिकचे कुलूप तोडून आतून ३०,००० रुपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केली.

पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांच्यासह पोलीस हवालदार कैलास शिंदे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. एकाच रात्रीत तीन ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या अज्ञात चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!