खाकीच्या कारवाईनंतर आता प्रशासनाचा हातोडा; पोलीस आणि मनपाच्या संयुक्त कारवाईने गुन्हेगारी साम्राज्याला हादरा!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१६:- (विशेष प्रतिनिधी):नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याच्या मुलाच्या अटकेनंतर आता थेट राज्याच्या गृहमंत्रालयाने नाशिकमधील गुन्हेगारी संपवण्याचा विडा उचलला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कठोर आदेशानंतर, आज नाशिक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत प्रकाश लोंढे याचा पुलावरील बंगला अक्षरशः जमीनदोस्त केला आहे. हा बंगला केवळ एक इमारत नसून, अनेक वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांचा मुख्य अड्डा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस फौजफाट्यात गुन्हेगारीचे ‘लंका-दहन’
‘औरा’ बार गोळीबार प्रकरणानंतर प्रकाश लोंढे आणि त्याच्या मुलाला अटक करून त्यांची ‘दिंड’ काढणाऱ्या पोलिसांनी आज पुन्हा एकदा आपला रुद्रावतार दाखवला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पोलिसांच्या अभेद्य बंदोबस्तात महापालिकेचे बुलडोझर घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांतच गुन्हेगारीचा हा अड्डा मातीमोल केला. या कारवाईने नाशिकमधील गुन्हेगारी विश्वाला स्पष्ट संदेश दिला आहे की, ‘आता तुमची खैर नाही!’
मुख्यमंत्र्यांनी दिले होते थेट आदेश!
काही दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या गुन्हेगारीविरोधी मोहिमेचे जाहीर कौतुक केले होते. त्याचवेळी त्यांनी महानगरपालिका प्रशासनालाही गुन्हेगारांच्या अवैध मालमत्तांवर आणि अतिक्रमणांवर कोणतीही दयामाया न दाखवता कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतरच प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली आणि आजच्या या धडक कारवाईचे नियोजन करण्यात आले.
“बंगला नव्हे, गुन्हेगारीचा अड्डाच उद्ध्वस्त झाला! अनेक वर्षांपासून इथे दहशतीचे वातावरण होते. पोलीस आणि प्रशासनाच्या या कारवाईने आम्हाला न्याय मिळाला.”
– एका स्थानिक नागरिकाची प्रतिक्रिया
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल
विशेष म्हणजे, हा वादग्रस्त बंगला यापूर्वीही एकदा पाडण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तो पुन्हा दिमाखात उभा राहिला. “जेव्हा हे अवैध बांधकाम पुन्हा उभे राहत होते, तेव्हा महापालिका प्रशासन झोपले होते का?” असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत.
या संयुक्त कारवाईमुळे नाशिकमधील गुन्हेगारी आणि त्याला मिळणाऱ्या राजकीय व प्रशासकीय आश्रयावर थेट प्रहार झाला आहे. ‘मोक्का’च्या कारवाईच्या दारात उभ्या असलेल्या लोंढे पिता-पुत्रांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. यापुढेही शहरात अशा धडक कारवाया सुरू राहणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







