नाशिकच्या गुन्हेगारी विश्वाला जोरदार दणका; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि दंगलीचा म्होरक्या बंटी शेख पोलिसांच्या जाळ्यात.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा आदेश, अन् अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अचूक वेध; बंटी शेखच्या अटकेने पोलिसांची मान उंचावली!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१२ : शहरात अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा आणि दंगलीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड अकील पिर मोहम्मद शेख उर्फ बंटी शेख याला अखेर गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच गच्चीवरून उडी मारून पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिताफीने उधळून लावला. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहरातील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. या आदेशानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना एक गोपनीय आणि खात्रीशीर खबर मिळाली. दंगलीच्या गुन्ह्यात (मुंबई नाका पोलीस ठाणे गुरनं १३४/२०२५) फरार असलेला बंटी शेख हा खंडोबा चौकातील त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक सतर्क झाले.

क्षणाचाही विलंब न लावता वपोनि कोल्हे यांनी आपल्या पथकासह बंटी शेखच्या घराभोवती सापळा रचला. मात्र, पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून आणि परिसरातील हालचालींवरून बंटी शेख सावध झाला. पोलिसांना पाहताच त्याने थेट घराच्या गच्चीवरून उडी मारून पळ काढण्याचा थरारक प्रयत्न केला. पण, आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

बंटी शेख: गुन्हेगारीचा बादशाह!

बंटी शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर केवळ दंगलीचाच नव्हे, तर खुनाचाही गंभीर गुन्हा दाखल आहे. इंदिरानगर, भद्रकाली आणि घोटी पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्या, प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारामारी असे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसला आहे.

ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वपोनि सुशिला कोल्हे, सपोनि सचिन चौधरी, सपोनि विशाल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जीवाची बाजी लावून ही कामगिरी यशस्वी केली.

ताब्यात घेतलेल्या बंटी शेखला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!