नाशिकरोड पोलिसांची धडक कारवाई! सराईत गुन्हेगारासह दोघे एमडी ड्रग्जसह गजाआड; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

चोरी, दरोड्याचे गुन्हे नावावर, आता एमडी तस्करीत; नाशिकरोड पोलिसांच्या जाळ्यात सराईत अडकला!

लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि. २८: शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगारासह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल १२ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा २९.९ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ आणि एक व्हर्ना कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशिक शहरातील ड्रग्ज माफियांना मोठा हादरा बसला आहे.

या प्रकरणी राहुल संदीप सोनवणे (वय ३३)आणि केतन पांडुरंग पोले (वय २५) या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी राहुल सोनवणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, घरफोडी, दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • अशी झाली कारवाई

नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि त्यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जेलरोड परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

दिनांक २७ जुलै रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास जेलरोडवरील पाण्याच्या टाकीजवळ, डॉ. देवाकर बक्षी यांच्या बंगल्यासमोर पोलिसांना एमएच ०४ एफए ५०१३ या क्रमांकाची एक संशयास्पद व्हर्ना कार दिसली. पोलिसांनी गाडीला थांबवून झडती घेतली असता, गाडीतील राहुल सोनवणे आणि केतन पोले यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे २९.९ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ सापडला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १२ लाखांपेक्षा जास्त आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.

मुख्य आरोपीचा गुन्हेगारीचा लांबचा इतिहास

या कारवाईत पकडलेला मुख्य आरोपी राहुल सोनवणे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी धक्कादायक आहे. त्याच्यावर नाशिकरोड, अंबड, भद्रकाली, उपनगर, लासलगाव, तसेच अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत, तरीही तो पुन्हा याच व्यवसायात सक्रिय होता. दुसरा आरोपी केतन पोले याचा मात्र कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.

पोलीस हवालदार विजय टेमगर यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यातगुरनं ३८२/२०२५ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पसरले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. या मोठ्या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!