नाशिकरोड पोलिसांचा गुन्हेगारीवर ‘त्रिशूळ’ प्रहार! दहशत माजवणारी दरोड्याची टोळी, लाखोंचा ऐवज लंपास करणारा घरफोड्या आणि गावठी कट्ट्यासह फिरणारा सराईत गुन्हेगार… तिघेही एकाच वेळी जेरबंद!

२४ तासात ३ ‘गेम ओव्हर’! नाशिकरोड पोलिसांची गुन्हेगारी विरोधात ‘हॅट्ट्रिक

  1.  सुभाषरोड परिसरात दहशत माजवणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांच्या मुसक्या आवळल्या, धारदार शस्त्रे जप्त.
  2.      लाखोंचा मुद्देमाल विकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत घरफोड्याला सापळा रचून रंगेहाथ पकडले.
  3.      अवैध गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने अटक.

लाल 🚨 दिवा-नाशिकरोड,दि.२०:- प्रतिनिधी:नाशिक शहरात गुन्हेगारीविरोधात पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी उघडलेल्या धडक मोहिमेला नाशिकरोड पोलिसांनी दणकेबाज प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने (डी. बी. पथक) केलेल्या ‘त्रिसूत्री’ कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने केलेल्या तीन मोठ्या कारवायांमुळे पोलिसांनी एकाच वेळी दरोडेखोर, घरफोड्या आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराला जेरबंद करून आपल्या कार्यक्षमतेचा परिचय दिला आहे.

थरार… दरोडेखोरांच्या दहशतीचा आणि पोलिसांच्या जवाबाचा!

दिनांक १६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सुभाषरोड येथील भारती मठ परिसरात हर्षल म्हस्के उर्फ टोन्या पाईकराव आणि त्याच्या १२ साथीदारांनी जुन्या वादातून अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हातात कोयते, चॉपर यांसारखी धारदार शस्त्रे घेऊन या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत १३०० रुपये हिसकावले. इतकेच नव्हे, तर परिसरातील घरांच्या दरवाजांवर आणि रिक्षावर शस्त्रानी वार करून प्रचंड नुकसान करत हे टोळके पसार झाले होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी त्वरित सूत्रे हलवली. पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर आणि गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने एकलहरा रोडवरील किर्लोस्कर टेकडी परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने मोठ्या शिताफीने ६ जणांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ४ धारदार लोखंडी कोयते आणि चॉपर जप्त करण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या जलद कारवाईने पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरात दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

चोर तो चोर, वर शिरजोर; पण पोलिसांपुढे निरुत्तर !

एकीकडे दरोडेखोरांचा छडा लावत असतानाच, दुसरीकडे गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्या चोराला रंगेहाथ पकडून आणखी एक मोठी कामगिरी केली. दिनांक १८ सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीचा सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी सामनगाव रोड परिसरात येणार आहे.

या माहितीच्या आधारे सपोनि प्रवीण सूर्यवंशी आणि पोउनि संदीप पवार यांच्या पथकाने सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजजवळ सापळा रचला. पोलिसांना पाहताच संशयित महेश गोपाल अनवट (वय २१) याने पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून २२.४७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६,००० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे नाशिकरोड पोलीस ठाण्यातील एक मोठा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

कट्टा’ कमर मे, इरादे खतरनाक; पोलिसांनी डाव उधळला!

नाशिकरोड पोलिसांच्या कारवाईचा धडाका इथेच थांबला नाही. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे वरिष्ठांचे आदेश असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना सराईत गुन्हेगार रोहित उर्फ माल्ये गोविंद डिंगम हा गावठी कट्टा विकण्यासाठी गोरेवाडी परिसरात येणार असल्याची पक्की खबर मिळाली.

क्षणाचाही विलंब न लावता पोउनि संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने साध्या वेशात गोरेवाडी मनपा शाळेजवळ सापळा रचला. रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित डिंगम संशयास्पदरीत्या फिरताना दिसताच पोलिसांनी त्याला घेरले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), मॅगझीन आणि एक जिवंत काडतुस असा एकूण ३०,५०० रुपयांचा शस्त्रसाठा मिळून आला. या कारवाईमुळे एक मोठी अनुचित घटना टळली आहे.

नेतृत्व आणि सांघिक कामगिरीचे उत्तम उदाहरण!

ही यशस्वी आणि धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त श्री. किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक श्री. बडेसाब नाईकवाडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाच्या संदीप पवार

अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. या तिहेरी कारवाईमुळे नाशिकरोड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनांनी हेच सिद्ध केले आहे की, नाशिक पोलीस गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!