नाशिकरोड ! मध्यरात्री दरोड्याचा थरार, पिस्तुलासह सराईत टोळी जेरबंद; पोलिसांच्या सिनेस्टाईल कारवाईने मोठा अनर्थ टळला!

वालदेवी नदीकिनारी अंधारात रचला होता लूटमारीचा डाव; एका पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्रांसह चौघे गजाआड, तिघे फरार.

लाल 🚨 दिवा-नाशिकरोड,दि. १:- (आमच्या प्रतिनिधीकडून):मध्यरात्रीच्या भयाण शांततेत, वालदेवी नदीच्या पुलाखाली अंधाराच्या साम्राज्यात दबा धरून बसलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर नाशिकरोड पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुसक्या आवळल्या आहेत. रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या वाहनांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरात होणारा एक मोठा रक्तपाताचा कट उधळला गेला असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

घटनेची थरारक हकीकत अशी की, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक नेहमीप्रमाणे रात्रगस्त घालत होते. गस्त वालदेवी नदीच्या पुलाजवळ आली असता, विहीतगाव येथील बागुलनगर परिसरात काही इसम संशयास्पदरीत्या अंधारात दबा धरून बसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलीस त्यांच्या दिशेने जात असल्याची चाहूल लागताच, ६ ते ७ जणांच्या या टोळक्याने थेट नदीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात धूम ठोकली.

यावेळी पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून श्री. सपकाळे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अतिरिक्त बळ घटनास्थळी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पंडित अहिरे यांच्यासह अविनाश देवरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे आणि अजय देशमुख यांच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली.

मध्यरात्रीच्या अंधारात, झाडाझुडपात लपलेल्या आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी चार जणांना शिताफीने पकडले, मात्र अंधाराचा फायदा घेत त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता ते शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेले सराईत आरोपी:

  • 1. तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान (वय ३०, रा. देवळाली गाव)
  • 2. रहेमान जाफर शेख (वय २८, रा. देवळाली गाव)
  • 3. समीर जाकीर शेख (वय २२, रा. विजय नगर, नाशिकरोड)
  • 4. गौरव आनंद बावीस्कर (वय १९, रा. देवळाली गाव)

या चौघांची अंगझडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दोन धारदार शस्त्रे आणि दरोड्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या वाहनांना अडवून लूटमार करण्याचा कट रचला असल्याची कबुली दिली.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त श्री. किशोर काळे, आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे, श्री. बडेसाब नाईकवडे आणि संपूर्ण गुन्हे शोध पथकाने ही धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे नाशिकरोड परिसरात होणारी मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, लवकरच त्यांनाही जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!