नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वीच वादाची ठिणगी!, माजी नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण म्हणजे कायद्याचा अपमान; रिपब्लिकन सेनेचा थेट इशारा!

संवैधानिक पद नसताना मान कशासाठी? प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

लाल 🚨 दिवा-नाशिक, १३:-(विशेष प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच, नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील ध्वजारोहणावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुदत संपलेले आणि सध्या कोणतेही संवैधानिक पद नसलेले माजी नगरसेवक शाळांमध्ये ध्वजारोहण करणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून, हा प्रकार म्हणजे कायद्याचे आणि लोकशाहीचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा घणाघाती आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. याविरोधात सेनेने थेट महापालिका प्रशासनालाच धारेवर धरले आहे.

मुख्याध्यापकांवर दबाव, पदाचा गैरवापर?

गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट अनुभवणाऱ्या नाशिक महापालिकेत नगरसेवकांची मुदत केव्हाच संपली आहे. असे असतानाही, केवळ माजी नगरसेवक असल्याच्या नावाखाली काही व्यक्ती महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांवर दबाव टाकून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान मिळवण्याचा घाट घालत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. “हा केवळ पदाचा गैरवापर नसून, आपण अजूनही पदावर असल्याचा खोटा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे.

इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट

या प्रकारामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारी करत असलेले इच्छुक उमेदवार आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा मनमानी कारभार सुरू आहे का? कायद्याचे राज्य आहे की नाही?” असे संतप्त सवाल विचारले जात आहेत. यामुळे शहरात चुकीचा संदेश जात असून, प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयुक्तांना निवेदन, कारवाईची जोरदार मागणी

या गंभीर प्रकरणाची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. “संवैधानिक पदावर नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला ध्वजारोहण करण्यास तात्काळ मज्जाव करावा आणि कायद्याचा सन्मान राखावा,” अशी कळकळीची विनंती आणि जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात महानगरप्रमुख सुनील साळवे, उपजिल्हाध्यक्ष तुकाराम मोजाड आणि प्रसिद्धी प्रमुख सूरज गांगुर्डे यांचा समावेश होता.

आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि स्वातंत्र्यदिनी शाळांमधील तिरंग्याचा मान खऱ्या अर्थाने कुणाला मिळणार, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!