नाशिकमध्ये ‘ऑपरेशन शिस्त’! बेशिस्त रिक्षाचालकांना पोलिसांचा २ लाखांचा ‘झटका’; शहर वाहतुकीला मोकळा श्वास!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.६:- पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचा दिलेला आदेशाने नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी आरटीओ विभागाला सोबत घेऊन बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात अशी काही धडक कारवाई केली की, नियम मोडणाऱ्यांचे धाबेच दणाणले आहेत. एकाच दिवसात तब्बल ५० रिक्षाचालकांना जाळ्यात पकडत पोलिसांनी २ लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल करून शिस्तीचा नवा अध्याय सुरू केला आहे.

शहरातील वाहतूक कोंडी आणि रिक्षाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी पोलीस उपआयुक्त (वाहतूक) श्रीमती किरिथिका सी. एम. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. शहर वाहतूक शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी, श्री. युवराज पतकी यांच्या नेतृत्वात पोलीस आणि आरटीओ अधिकारी रस्त्यावर उतरले आणि बेशिस्तांना कायद्याचा दणका दिला.
राजदूत हॉटेल, सिव्हिल हॉस्पिटल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नल या नेहमी गजबजलेल्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. गणवेश न घालणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी (विशेषतः फ्रंट सीटवर) बसवणे, बॅच न लावणे, कागदपत्रे सोबत न ठेवणे आणि मुख्य म्हणजे वाहतुकीला अडथळा निर्माण करून कुठेही रिक्षा थांबवणे अशा विविध गुन्ह्यांसाठी रिक्षाचालकांना घेरण्यात आले. या संयुक्त कारवाईत तब्बल ५० बेशिस्त रिक्षाचालकांवर विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई-चलानद्वारे कारवाई करून तब्बल २,०१,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईनंतर बोलताना शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांनी सज्जड दम दिला आहे. “ही तर केवळ सुरुवात आहे. यापुढेही नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करत परवाने निलंबित करण्याची किंवा रिक्षा जप्त करण्याची कारवाई केली जाईल. नाशिककरांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक देणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पूर्ण करणारच,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे सर्वसामान्य नाशिककरांनी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.







