लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.७:-गणेश विसर्जनाच्या उत्साहावर विरजण घालणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरात घडली आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेला एक २४ वर्षीय तरुण नदीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
सुभाष चव्हाण (वय २४) असे या बेपत्ता तरुणाचे नाव आहे. काल सायंकाळी तो आपल्या मित्रपरिवारासह गणपती विसर्जनासाठी आनंदवली येथे गेला होता. उत्साहाच्या भरात मूर्ती विसर्जित करण्यासाठी तो पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला आणि काही क्षणातच दिसेनासा झाला.
हा प्रकार लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केली. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली, मात्र अंधारामुळे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
आज सकाळी पुन्हा एकदा अग्निशामक दलाच्या पथकाने शोधकार्य सुरू केले आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







