नाशिक विकास मंचच्या आंदोलनापुढे प्रशासन झुकले! २० वर्षांचा वनवास संपला, ड्रेनेज समस्येवर अखेर तोडगा!

साईनगर, उपेंद्र नगर, महालक्ष्मी नगरातील २००० घरांना मिळणार दिलासा; ‘बिऱ्हाड आंदोलना’ला अभूतपूर्व यश, ६६ लाखांचा निधी मंजूर!

लाल🚨 दिवा-नाशिक,दि.२५(आमच्याप्रतिनिधीकडून):गेली तब्बल २० वर्षे नरकयातना भोगणाऱ्या हजारो नागरिकांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. नाशिक विकास मंचचे अध्यक्ष ऍड. मनोज आहेर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीव्र आंदोलनापुढे झोपलेले महापालिका प्रशासन जागे झाले असून, साईग्राम, उपेंद्र नगर आणि महालक्ष्मी नगरातील गंभीर ड्रेनेज समस्येवर तोडगा काढण्यासाठी तब्बल ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे २००० कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या दोन दशकांपासून या भागातील नागरिक ड्रेनेजचे घाणेरडे पाणी थेट घरात घुसून होणाऱ्या त्रासाने अक्षरशः वैतागले होते. घरात साचणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती होती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. वारंवार तक्रारी, अर्ज-विनंत्या करूनही प्रशासकीय यंत्रणा ढिम्म होती. अखेर, प्रशासनाला जाग आणण्यासाठी नाशिक विकास मंचने २६ सप्टेंबर २०२३ रोजी थेट महापालिकेच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयात ‘बिऱ्हाड आंदोलन’ करत प्रशासनाला जोरदार धक्का दिला. घरात घुसणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त नागरिकांनी आपला संसारच पालिका कार्यालयात थाटण्याचा इशारा दिला होता.

या अनोख्या आणि आक्रमक आंदोलनाची दखल घेण्यास महापालिका प्रशासनाला भाग पडले. ऍड. मनोज आहेर आणि स्थानिक रहिवाशांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाने नमते घेत ६६ लाखांचा निधी मंजूर केला. लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

“एकजुटीचा विजय!” – ऍड. मनोज आहेर

या ऐतिहासिक यशानंतर बोलताना ऍड. मनोज आहेर म्हणाले, “हा केवळ आमचा नाही, तर २० वर्षे त्रास सहन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विजय आहे. लोकांची एकजूट आणि संघर्षाची ताकद काय असते, हे या आंदोलनाने दाखवून दिले आहे. या लढ्यात मार्गदर्शन करणारे महापालिका आयुक्त, विभागीय अधिकारी आणि आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे पत्रकार बांधव यांचे आम्ही ऋणी आहोत. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे हेच आमचे ध्येय असून, नागरिकांच्या सहकार्याने आणखी अनेक प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

या यशस्वी लढ्याबद्दल साईग्राम, उपेंद्र नगर आणि महालक्ष्मी नगरातील नागरिकांनी नाशिक विकास मंचचे आणि ऍड. आहेर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!