के. के. वाघच्या तरुण इंजिनिअर्सची कमाल; गोपनीय तक्रारींपासून ते अधिकाऱ्यांवर थेट नजर, सर्व काही एका क्लिकवर !
लाल 🚨 दिवा -नाशिक,दि.१(विशेषप्रतिनिधी):तंत्रज्ञानाच्या युगात नाशिक ग्रामीण पोलीस दलाने एक मोठी झेप घेतली आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आणि तक्रारींच्या त्वरित निवारणासाठी ‘रक्षक ए आय’ नावाचा अत्याधुनिक व्हॉट्सॲप चॅटबॉट आता नागरिकांच्या सेवेत रुजू झाला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे आता कोणतीही व्यक्ती घरबसल्या थेट पोलिसांशी संपर्क साधू शकणार असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे एक प्रभावी शस्त्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
https://www.nashikruralpolice.gov.in/
मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यातून प्रेरणा घेत, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकार झाला आहे. मिरखेलकर यांच्या देखरेखीखाली के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सौरभ शिंदे, निरज बावा, ओम निकम, श्रीनाथ कदम आणि यश वडनेरे या पाच तरुण तुर्क विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याची चुणूक दाखवत हा चॅटबॉट तयार केला आहे. प्राध्यापक श्री. धनंजय कानडे यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
काय आहे ‘रक्षक ए आय’?
‘रक्षक ए आय’ हा केवळ एक सामान्य चॅटबॉट नसून, तो एक स्मार्ट आणि बहुभाषिक सहाय्यक आहे. नागरिकांना आता पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या न लागता अनेक सुविधा त्यांच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध होणार आहेत.
‘रक्षक ए आय’ ची स्फोटक वैशिष्ट्ये:

गोपनीय तक्रारींचा पाऊस: आता कोणाचीही भीती न बाळगता, नागरिक आपली ओळख लपवून अवैध धंदे, किंवा इतर संवेदनशील विषयांवर थेट तक्रार करू शकणार आहेत.
अधिकाऱ्यांवरही नजर: या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धही थेट तक्रार करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे, ज्यामुळे पोलीस दलात पारदर्शकता वाढणार आहे.
स्मार्ट सहाय्यक: तुम्हाला जवळचे पोलीस स्टेशन शोधायचे असो किंवा एखादी कायदेशीर माहिती हवी असो, हा स्मार्ट सहाय्यक २४ तास तुमच्या मदतीला असेल.
बहुभाषिक मदत: मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्यामुळे भाषेची अडचण दूर होणार आहे.
तत्काळ प्रतिसाद: तुमची तक्रार नोंद होताच तुम्हाला तात्काळ प्रतिसाद मिळेल, ज्यामुळे दिरंगाईला पूर्णविराम बसेल.
“आमचा उद्देश पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करणे हा आहे. ‘रक्षक ए आय’ मुळे प्रत्येक नागरिकाला आपला आवाज थेट आमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही अधिक जलद आणि पारदर्शक सेवा देऊ शकू,” अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक, आदित्य मिरखेलकर ऋयांनी दिली.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा चॅटबॉट लवकरच नाशिक ग्रामीणच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि गुन्हेगारी नियंत्रणात एक नवा अध्याय सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, गुन्हेगारी विश्वात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.







