लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२४:-: शहरात फोफावलेल्या वाहनचोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट-२ ने एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. अत्यंत शिताफीने रचलेल्या सापळ्यात एका सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी आणि अंमलदार शहरात गस्त घालत असताना, कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना त्यांच्या विश्वासू खबऱ्याकडून एक पक्की माहिती मिळाली. एक तरुण चोरीची, नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल विकण्यासाठी पाथर्डी फाट्याजवळील मॅकडोनाल्ड हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत येणार असल्याची ती खबर होती. क्षणाचाही विलंब न लावता, त्यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांना दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि मुक्तारखान पठाण यांच्या नेतृत्वात सपोउनि गुलाब सोनार, पोहवा अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आणि पोअं प्रविण वानखेडे यांचे एक धाडसी पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, एक तरुण हिरो पॅशन प्रो गाडीवर संशयास्पद रित्या घुटमळताना दिसला. काही कळायच्या आतच पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून त्याला ताब्यात घेतले.
पकडलेल्या तरुणाला त्याचे नाव विचारताच त्याने ओम विनोद सोनवणे (वय १८, रा. भाभानगर, नाशिक) असे सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ओमला पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने कबूल केले की, त्याच्या ताब्यातील ३०,००० रुपये किमतीची पॅशन प्रो मोटारसायकल त्याने तीन आठवड्यांपूर्वी भाभानगर येथील साईसिद्धी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरली होती. इतकेच नाही, तर पंचवटीतील धनदाई लॉन्स समोरून एक होंडा ॲक्टिव्हा मोपेड गाडी देखील रात्रीच्या वेळी चोरल्याची कबुली त्याने दिली.
आरोपी ओम सोनवणे याने दिलेल्या कबुली जबाबावरून पोलिसांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यातील एक आणि पंचवटी पोलीस ठाण्यातील एक, असे मोटारसायकल चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून एकूण ७०,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ च्या धाडसी पथकाने केली आहे. नाशिक पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले असून, ‘कानून के हाथ लंबे होते है’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.







