नाशिक पोलिसांचा थरार! फिल्मी स्टाईल पाठलाग करून सराईत चैनस्नॅचरला ठोकल्या बेड्या!

यशस्वी ‘ऑपरेशन चेस’! आडगाव पोलिसांच्या सतर्कतेने मोठी कारवाई यशस्वी.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २३ जुलै: शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक पोलीस दल किती सजग आणि कार्यक्षम आहे, याचा थरारक प्रत्यय मंगळवारी नाशिककरांनी अनुभवला. दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग करून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा सिनेमाच्या दृश्यालाही लाजवेल असा पाठलाग करून आडगाव पोलिसांनी एका आरोपीला शिताफीने जेरबंद केले. या धाडसी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी आडगाव पोलीस पथकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

नेमके काय घडले? मंगळवारी (दि. २२ जुलै) सायंकाळी कोणार्कनगर येथील सेल्फी पॉईंटजवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोन चोरटे सिल्व्हर रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून सुसाट वेगाने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून संदेश प्रसारित झाला आणि आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक विजेच्या वेगाने कामाला लागले.

पोलीस हवालदार निलेश काटकर आणि पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे यांना चोरटे जत्रा हॉटेलच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गुन्हे शोध पथकाचे सहकारी रावजी मगर आणि निखिल वाघचौरे यांना सतर्क केले. या चारही बहाद्दर पोलिसांनी एकाच गाडीतून आरोपींचा पाठलाग सुरू केला.

  • शहरात रंगला थरारक पाठलाग!

बळी मंदिराच्या ब्रिजवरून आरोपी वेगाने पुढे जात होते. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता गाडीचा वेग वाढवला. राणेनगर, गोविंद नगर, सिटी सेंटर मॉल, कामटवाडे असा शहराचा मोठा भाग पिंजून काढत हा पाठलाग सुरू होता. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी अंबड एमआयडीसी परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि अंगातील जॅकेट व हेल्मेट काढून गर्दीत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आडगाव पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटू शकले नाहीत. पोलिसांनी गाडीतून उतरून पायी धावत त्यांचा पाठलाग सुरू केला आणि अखेर प्रचंड धावपळीनंतर एका आरोपीला, अली हसत अफसर जाफरी (वय २५, रा. मुंबई)याला झडप घालून पकडले. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल, आरोपीचा मोबाईल आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन, पथकाचे शौर्य

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय पिसे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक निखील बोंडे, पोलीस उपनिरीक्षक मयुर निकम आणि प्रत्यक्ष पाठलाग करणारे पोलीस हवालदार निलेश काटकर, रावजी मगर आणि पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे यांच्या पथकाने हे यश मिळवले.

या थरारक कारवाईने नाशिक पोलीस गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या धाडसी कामगिरीबद्दल संपूर्ण शहरातून आडगाव पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!