विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत पार पडला पारितोषिक वितरण सोहळा; सरदार चौक आणि श्री प्रतिष्ठान मंडळ ठरले अव्वल.
लाल 🚨 दिवा&नाशिक, दि. २८ (विशेष प्रतिनिधी):केवळ उत्सवाचा डामडौल न करता, सामाजिक बांधिलकीचे भान जपत कायदा आणि सुव्यवस्थेच्या पालनासाठी पोलिसांना सहकार्य करणाऱ्या शहरातील आदर्श सार्वजनिक गणेश मंडळांच्या पाठीवर आज नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने कौतुकाची थाप दिली. २०२४ च्या गणेशोत्सवात शिस्त, पर्यावरण पूरकता आणि जनजागृतीचा आदर्श निर्माण करणाऱ्या मंडळांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलीस आणि नागरिक यांच्यातील सहकार्याचे नाते अधोरेखित करणारा हा हृद्य सोहळा गंगापूर रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.
या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे आयुक्त मा. श्री. प्रवीण गेडाम होते. तर देवळालीच्या आमदार मा. श्रीमती सरोज अहिरे, जिल्हाधिकारी मा. श्री. जलज शर्मा आणि नाशिकचे पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीने आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषपूर्ण प्रतिसादाने कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त झाली.
उत्सव हे विधायक बदलाचे माध्यम – पोलीस आयुक्त
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक यांनी नाशिककरांच्या शिस्तीचे कौतुक केले. ते म्हणाले, “नाशिकचा गणेशोत्सव हा केवळ दहा दिवसांचा सण नसून, तो पोलीस दल आणि जनता यांच्यातील समन्वयाचा एक उत्तम नमुना आहे. मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे, वाहतुकीला अडथळा न करणारी रचना आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून उत्सवाला एक विधायक स्वरूप दिले. हा पुरस्कार त्याच सकारात्मक दृष्टिकोनाचा सन्मान आहे.”
नाशिकचा आदर्श राज्यासाठी प्रेरणादायी – विभागीय आयुक्त
अध्यक्षीय भाषणात विभागीय आयुक्त मा. श्री. प्रवीण गेडाम यांनी मंडळांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “जेव्हा उत्सव सामाजिक जबाबदारीने साजरे होतात, तेव्हा ते समाजासाठी प्रेरणास्रोत बनतात. नाशिकच्या गणेश मंडळांनी दाखवलेली ही प्रगल्भता संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व मंडळे अभिनंदनास पात्र आहेत.”
यावेळी आमदार श्रीमती सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांनीही मनोगत व्यक्त करत विजेत्या मंडळांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी सामाजिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी केले, तर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस उपआयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, श्रीमती मोनिका राऊत, श्री. किशोर काळे, श्री. चंद्रकांत खांडवी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सन २०२४ चे मानकरी ठरलेले आदर्श गणेश मंडळ:
परिमंडळ-१
प्रथम क्रमांक: सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी
द्वितीय क्रमांक:श्री. राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला, क्रीडा मित्र मंडळ, जुनी तांबट लेन, भद्रकाली
तृतीय क्रमांक: विघ्नकर्ता मित्र मंडळ, राजपाल कॉलनी, पंचवटी
उत्तेजनार्थ: न्यु स्फुर्ती लोणार लेन युवक मित्र मंडळ (रविवार कारंजा) आणि सार्वजनिक वाचनालय टिळकपथ (भद्रकाली).
परिमंडळ-२
प्रथम क्रमांक: श्री. प्रतिष्ठान मित्रमंडळ, श्रद्धा विहार, वडाळा-पाथर्डी रोड
द्वितीय क्रमांक: आयएसपी-सीएनपी वेल्फेअर फंड कमिटी, नाशिकरोड
तृतीय क्रमांक (विभागून): अमरज्योत मित्र मंडळ (सातपूर गाव) आणि शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था (देवळाली कॅम्प).
उत्तेजनार्थ: कपालेश्वर राजा मित्रमंडळ (उपनगर) आणि सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती (सातपूर कॉलनी).







