घटनास्थळावरूनच मिळणार ठोस पुरावे, दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार; नाशिककरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २७ (प्रतिनिधीकडून):नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शहर पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कोणत्याही गुन्ह्याचा तपास वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून असतो आणि हेच सत्य ओळखून, नाशिक शहर पोलिसांच्या ताफ्यात आज, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी, एक अत्यंत अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल झाली आहे. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्घाटन होताच, गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवणारे हे ‘हाय-टेक ब्रह्मास्त्र’ आता पोलिसांच्या सेवेत रुजू झाले आहे.
नवीन फौजदारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण (दोषसिद्धी दर) वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग अत्यंत कटिबद्ध आहे. याच धोरणाचा भाग म्हणून, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामार्फत ही विशेष व्हॅन नाशिक पोलिसांना सुपूर्द करण्यात आली आहे. या व्हॅनमुळे आता पोलिसांना गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या ठिकाणी तात्काळ पोहोचून, कोणताही पुरावा नष्ट होण्याआधी तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे शक्य होणार आहे.
काय आहे या ‘फिरत्या प्रयोगशाळे’ची खासियत?
ही केवळ एक गाडी नसून, एक चालती-बोलती अत्याधुनिक न्यायसहायक प्रयोगशाळाच आहे. यामध्ये रक्ताचे नमुने, फिंगरप्रिंट्स, डीएनए सॅम्पल्स, घटनास्थळावरील माती आणि इतर सूक्ष्म-तिसूक्ष्म पुरावे गोळा करण्यासाठी आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारी सर्व जागतिक दर्जाची उपकरणे आहेत. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी ही व्हॅन पोहोचताच, तज्ज्ञांचे पथक क्षणाचाही विलंब न लावता आपले काम सुरू करेल. यामुळे तपासाला सुरुवातीपासूनच योग्य आणि वेगवान दिशा मिळेल, ज्यामुळे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाहीत.

उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आश्वासक वातावरणात हा सोहळा पार पडला. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी हिरवा झेंडा दाखवून या व्हॅनला पोलीस दलाच्या सेवेत दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री. चंद्रकांत खांडवी, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उप संचालक श्री. राहुल पवार, गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त श्री. संदिप मिटके यांच्यासह पोलीस दलातील आणि न्यायसहायक प्रयोगशाळेतील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नाशिककरांना सुरक्षिततेची ग्वाही देत होता.
पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी यावेळी बोलताना सांगितले, “ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन म्हणजे नाशिक पोलिसांच्या तपास क्षमतेत झालेली एक मोठी क्रांती आहे. आता आमचे अधिकारी आणि कर्मचारी अधिक आत्मविश्वासाने आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील. नाशिककरांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणार.”
या एकाच पावलामुळे नाशिक शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, आता गुन्हेगारांना कोणताही गुन्हा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागणार आहे, हे मात्र नक्की







