आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर उपायुक्त किशोर काळे यांची धडक कारवाई; गुन्हेगारी जगतात खळबळ.
लाल 🚨 दिवा -नाशिक,दि.२८:- (प्रतिनिधीकडून):नाशिक शहरात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर, परिमंडळ-२ चे नवनियुक्त पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या आकाश प्रल्हाद आव्हाड या सराईत गुन्हेगाराला थेट नाशिक शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करत त्यांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
- काय आहे प्रकरण?
अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील मयुरी गार्डन, गणेश चौक, सिडको येथे राहणारा आकाश प्रल्हाद आव्हाड (वय २०) याच्यावर गंभीर दुखापत करणे, जीवघेणा हल्ला करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्रे बाळगणे आणि मनाई आदेशांचे उल्लंघन करणे असे एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली होती.
उपायुक्तांनी स्वीकारताच लावला कामाचा सपाटा
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, परिमंडळ-२ चा कार्यभार स्वीकारताच उपायुक्त किशोर काळे यांनी गुन्हेगारांची कुंडली तपासण्यास सुरुवात केली. आव्हाड विरोधातील तडीपारीचा प्रलंबित प्रस्ताव त्यांनी तातडीने निकाली काढत, त्याला दि. २३/०७/२०२७ पर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला.
गुन्हेगारांनो, आता सुधरा, नाहीतर...
येत्या काळात होणारे सण, उत्सव आणि नाशिक महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर हद्दपारी, स्थानबद्धता (एमपीडीए) आणि मोक्कासारख्या कठोर कारवायांचा बडगा उगारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांवरही करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनो, तुम्हीच ‘साध्या वेशातील पोलीस’ बना !
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हद्दपार केलेला गुन्हेगार आकाश आव्हाड नाशिक शहर किंवा जिल्ह्यात कुठेही दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याच्या मोहिमेला यश मिळेल.







