नाशिक पोलिसांचा घुसखोरांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! ४ बांग्लादेशी महिलांसह बनावट ओळखपत्रे बनवणारा एजंट गजाआड!

गुन्हे शाखा युनिट १ ची धडाकेबाज कामगिरी; शहरात खळबळ!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २० जुलै:नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी उघडलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या शूर पथकाने एका थरारक कारवाईत, बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या ४ बांग्लादेशी महिला आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका एजंटच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कारवाईमुळे शहरातील देशविघातक कारवाया करणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अशी झाली कारवाई:

पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्री. किरकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात घुसखोरांचा शोध सुरू होता. दरम्यान, अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून खैरेमळा, लक्ष्मीनगर परिसरात काही बांग्लादेशी महिला अवैधरित्या राहत असल्याची पक्की खबर मिळाली.

या माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांनी क्षणाचाही विलंब न लावता दोन विशेष पथके तयार केली. या पथकांनी दिनांक २०/०७/२०२५ रोजी खैरेमळा, लक्ष्मीनगर आणि साईनगर, अमृतधाम, पंचवटी या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला.

बनावट ओळखीचा पर्दाफाश:

पोलिसांनी छापा टाकला असता, त्या ठिकाणी ४ महिला आढळून आल्या. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या बांग्लादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. धक्कादायक म्हणजे, या महिलांकडे बनावट आधारकार्ड आणि इतर खोटी भारतीय ओळखपत्रे सापडली. या महिलांनी सीमा सुरक्षा दलाच्या किंवा कोणत्याही मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.

एजंटासह रॅकेट उद्ध्वस्त:

पोलिसांनी खाक्या दाखवताच या महिलांनी पोपटासारखी माहिती ओकली. त्यांना ही बनावट ओळखपत्रे नवजीत भवन दास (वय ३८) याने बनवून दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या रॅकेटच्या सूत्रधाराला, नवजीत दास यालाही बेड्या ठोकल्या. या रॅकेटचे धागेदोरे सुरत येथील जगदीश मिस्तरी आणि थेट बांग्लादेशातील दोन व्यक्तींपर्यंत पोहोचले असल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या घुसखोर महिला:

  • १. माईशा हाबिब शेख (वय २२, रा. बोरीशन, बांग्लादेश)
  • २. निशान मिहिर शेख (वय २१, रा. अलिपुर, बांग्लादेश)
  • ३. झुमूर हसन शेख (वय ३३, रा. शिदीपाशा, बांग्लादेश)
  • ४. रिहाना जलील गाझी (वय ३०, रा. चंडीपूर, बांग्लादेश)

या सर्व आरोपींविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, पारपत्र कायदा आणि परकीय नागरिक कायद्याच्या गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौतुकास्पद कामगिरी:

नाशिक शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाने केलेली ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्री. किरकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदिप मिटके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही धाडसी मोहीम यशस्वी केली. या कामगिरीमुळे नाशिक पोलिसांच्या दक्षतेचे आणि शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!