मध्यवर्ती गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; अडीच लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित सिगारेटचा साठा जप्त, एकाला अटक.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८:- (विशेष प्रतिनिधी):नाशिक शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या अवैध सिगारेट माफियांना नाशिक शहर पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या धाडसी पथकाने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे सिडको परिसरात असलेल्या एका गोडाऊनवर धाड टाकून तब्बल २,५६,८५५ रुपये किमतीचा प्रतिबंधित आणि बनावट सिगारेटचा महाकाय साठा जप्त केला आहे. पोलिसांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील अवैध धंद्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले असून, गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशाचे पालन करत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मा. श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी आपल्या पथकाला सतर्क केले होते.
दिनांक २५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखेला त्यांच्या अत्यंत विश्वासू गुप्त बातमीदारामार्फत सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथील ‘विघ्नहर ट्रेडर्स’मध्ये आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या अवैध सिगारेटचा साठा असल्याची पक्की खबर मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता वपोनि. डॉ. मुदगल यांनी सपोनि. विश्वास चव्हाणके आणि सपोनि. प्रविण माळी यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार केले.
या पथकाने अत्यंत नियोजनबद्धरीत्या सापळा रचून ‘विघ्नहर ट्रेडर्स’वर धडक दिली. गोडाऊनची झडती घेतली असता पोलिसांचेही डोळे विस्फारले. आतमध्ये प्रतिबंधित, बनावट, आरोग्याचा वैधानिक इशारा नसलेल्या आणि मुदतबाह्य सिगारेटच्या बॉक्सचा खच पडला होता. पोलिसांनी गोडाऊनचा मालक सुनील रघुनाथ मुसळे (वय ४९) याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. तो हा विषारी साठा शहरात होलसेल आणि किरकोळ स्वरूपात विकून नागरिकांच्या, विशेषतः तरुण पिढीच्या जीवाशी खेळत होता.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक यांनी या धाडसी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे. डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. विश्वास चव्हाणके, सपोनि. प्रविण माळी, सपोउपनि. शेरखान पठाण, सपोउपनि. किशोर देसले, पोहवा. गणेश वाघ, प्रजित ठाकूर आणि मपोकॉ. वैशाली घरटे यांनी बजावलेल्या या कामगिरीमुळे नाशिक पोलीस दल शहराला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी किती कटिबद्ध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना जबर जरब बसली आहे.







