खाकीचा धडाका! डोळ्यात तेल घालून ठेवला पहारा, अन् ५ लाखांच्या स्कोडा कारमधील गोमांस तस्करीचा डाव उधळला
लाल 🚨 दिवा -दि.११:-नवीन नाशिक प्रतिनिधी :गुन्हेगार कितीही शहाणा असला आणि त्याने गुन्ह्यासाठी कितीही नवनवीन शक्कल लढवली, तरी पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटू शकत नाही, याचाच प्रत्यय नाशिकमध्ये पुन्हा एकदा आला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे-सातपूर लिंक रोडवर एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत शिताफीने ‘फिल्डिंग’ लावून एका अलिशान स्कोडा गाडीतून होणारी अवैध गोमांस तस्करी उधळून लावली आहे. पोलिसांच्या या धडक आणि सतर्क कारवाईमुळे तब्बल १०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, तस्करांच्या मनसुब्यांवर ‘खाकी’ने पाणी फेरले आहे.
असा रचला गेला ‘परफेक्ट’ सापळा…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. याच दरम्यान, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत खात्रीलायक माहिती मिळाली. एका चारचाकी गाडीतून अवैध गोमांसाची मोठी खेप नाशिकमध्ये आणली जाणार असल्याची ती पक्की टीप होती. क्षणाचाही विलंब न लावता ढाकणे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक नरुटे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एका अचूक सापळ्याची रचना करण्यात आली.
अलिशान गाडी, आत काळाबाजार; पण पोलिसांचा घेराव पडलाच!
पोलिसांच्या पथकाने गरवारे-सातपूर लिंक रोडवर अत्यंत गुप्तपणे पाळत ठेवली. माहितीतील वर्णनानुसार एक संशयित स्कोडा कार (एम एच ४८ – ०१७८) त्या मार्गावरून येताना दिसली. पोलिसांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने, संशयिताला कोणतीही पळवाट न ठेवता चहुबाजूंनी गाडीला घेराव घातला आणि ती रोखली. या अलिशान गाडीची तपासणी केली असता, पोलिसांचा संशय खरा ठरला. गाडीच्या आतून छुप्या पद्धतीने विक्रीसाठी घेऊन चाललेले तब्बल १०० किलो वजनाचे गोमांस आढळून आले. अलिशान गाडीचा वापर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा आरोपीचा डाव एमआयडीसी पोलिसांनी जागीच हाणून पाडला.

मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त
या धडक कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपी अजहर अंजुम कुरेशी (रा. रो हाऊस नं. ४, नवदीप अपार्टमेंट, सात्विक नगर, पखाल रोड, नाशिक) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून २० हजार रुपये किमतीचे १०० किलो गोमांस आणि ५ लाख रुपये किमतीची स्कोडा कार असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे आणखी मोठी साखळी आहे का? याचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले अत्यंत बारकाईने करत आहेत.
‘या’ सतर्क टीमची दमदार कामगिरी
खाकी वर्दीची शान वाढवणारी ही अभिमानास्पद आणि धाडसी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, श्रीहरी बिराजदार, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, किरण सोनवणे, ज्ञानेश्वर सहाणे आणि आमिर शेख या सतर्क पथकाने पार पाडली. एमआयडीसी पोलिसांच्या या ‘ऑपरेशन’मुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांमधून पोलिसांच्या या धडक कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत व कौतुक होत आहे.






