लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१६:-विशेष प्रतिनिधी, नाशिक प्रभू रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली नाशिक नगरी! पण आजकाल याच पुण्यभूमीत भोंदू बाबांचे आणि धर्माच्या नावाखाली धंदा मांडणाऱ्यांचे पेव फुटले आहे. बॉलिवूडचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, “ये शहर जितना शांत दिखता है, अंदर से उतना ही सुलग रहा है!” अगदी तशीच अवस्था आज नाशिककरांची झाली आहे आणि या संतापाचे मुख्य कारण ठरला आहे तो ‘आसाराम बापू पूल’!
“ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू!”
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वीच अशा ढोंगी बाबांचे वस्त्रहरण आपल्या अभंगातून केले होते. पण आपण त्यातून काय बोध घेतला? आसाराम बापू आणि राम रहीम… भक्तीच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणारे हे भोंदू बाबा एकेकाळी “रिश्ते में तो हम तुम्हारे बाप (बापू) लगते हैं!” अशा अविर्भावात वावरायचे. पण जेव्हा कायद्याचा बडगा उगारला गेला, तेव्हा “तारीख पे तारीख” करूनही या दोघांची रवानगी थेट कारागृहात झाली. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यासारखे नीच कृत्य करणाऱ्या आसारामचा काळाकुट्ट इतिहास संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा आहे. आज हाच ढोंगी बाबा आजन्म कारावासाची शिक्षा भोगत गजाआड चक्की पिसत आहे.
हे दोन बाबा आत गेले म्हणजे समाज सुधारला असे नाही. आज अशोक खरात सारखी उदाहरणे समोर येत आहेत, ज्यांच्यावर टीसीएस सारख्या कंपनीच्या संदर्भात किंवा इतर माध्यमातून लैंगिक शोषणाचे व्हिडिओ प्रसारित केल्याचे भयंकर आरोप ऐकायला मिळत आहेत. दुसरीकडे धर्माचे ठेकेदार बनलेले तथाकथित ‘अण्णा गुरुमाऊली’ असोत… या सर्वांचा बुरखा फाटणे गरजेचे आहे. “नाम बडे आणि दर्शन खोटे” असाच हा सर्व प्रकार आहे.
महानगरपालिका प्रशासनाला “जागो मोहन प्यारे जागो” म्हणण्याची वेळ!
इतके भयंकर रामायण घडूनही आणि आसारामचे काळे कारनामे उघडकीस येऊनही नाशिक महानगरपालिका प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात अजूनही एका पुलाचे नाव ‘आसाराम बापू पूल’ कसे काय असू शकते? प्रशासनाला अजूनही सद्बुद्धी का येत नाहीये? “डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकिन है” या भ्रमात राहणाऱ्या आसारामला कायद्याने त्याची जागा दाखवून दिली, मग पुलावरील त्याचे नाव पुसायला प्रशासनाचे हात का थरथरत आहेत?
“देवाला देवळात शोधू नका, माणसांत शोधा!”
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा आणि विचारांचा जो मंत्र दिला, तो आपण विसरलो आहोत. आता नाशिककरांचा संयम सुटला आहे. “एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर मैं अपनी भी नहीं सुनता!” या आविर्भावात आता नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. सदर पुलाचे नाव त्वरित बदलून नाशिकच्या विकासात योगदान देणाऱ्या एखाद्या खऱ्या महापुरुषाचे नाव या पुलाला देण्यात यावे, अशी मागणी आता जनआंदोलनाचे रूप घेत आहे.
महानगरपालिकेने वेळीच पावले उचलली नाहीत आणि या पुलाचे नामकरण बदलले नाही, तर इथली जनता “सिंघम” स्टाईलने रस्त्यावर उतरेल आणि प्रशासनाला त्यांची जागा दाखवून देईल, यात तीळमात्र शंका नाही!






