पुण्याच्या दक्षता पथकाच्या कारवाईने पर्दाफाश; कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १४: राज्याच्या कारागृह प्रशासनाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आली आहे. ‘रक्षकच भक्षक’ बनल्याचा प्रकार समोर आला असून, एका कारागृह शिपायाने चक्क एका कैद्यासोबत संगनमत करून बनावट शासकीय कागदपत्रांच्या आधारे एक मोठे रॅकेट चालवल्याचे उघड झाले आहे.
पुण्याच्या दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कारागृह शिपाई आणि एका कैद्यासह इतर अज्ञात आरोपींविरोधात फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी असलेल्या ‘स्मार्टफोन सुविधा कार्ड (अॅलन कार्ड)’ योजनेत हा घोटाळा झाला आहे. या योजनेचे कामकाज पाहणारा कारागृह शिपाई वैभव नामदेव लांडगे आणि कारागृहात शिक्षा भोगत असलेला बंदी दिपक रामभाऊ ढाकणे (बंदी क्र. 12644) हे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींनी डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत हा घोटाळा केला. त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोपरगाव शहर आणि कराड पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे बनावट शिक्के तयार केले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या बनावट सह्या करून खोटे पोलीस व्हेरिफिकेशन अहवाल तयार केले. हे बनावट दस्तऐवज खरे भासवून त्यांनी शासनाची आणि कारागृह प्रशासनाची घोर फसवणूक केली व ‘स्मार्टफोन सुविधा कार्ड’ योजनेचा गैरवापर केला.
कारागृह व सुधारसेवा, पुणे येथील दक्षता पथकाचे कारागृह शिपाई प्रदीप नाना हारगुडे आणि त्यांच्या पथकाने ४ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिकरोड कारागृहाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्या अनुषंगाने केलेल्या सखोल चौकशीत हा संपूर्ण बनावटगिरीचा प्रकार उघडकीस आला. चौकशीअंती पुरावे हाती लागताच हारगुडे यांनी शासनाच्या वतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दाखल केली.
या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेचा आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खुद्द कारागृहाचा कर्मचारीच अशा गंभीर गुन्ह्यात सामील झाल्याने पोलीस आणि कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक नाईकवाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.







