नाशिक हादरले! इंदिरानगरमध्ये बंद घराचा कडी-कोयंडा तोडून साडेदहा लाखांचा ऐवज लंपास!

पोलिसांना आव्हान; तब्बल नऊ दिवस बंद असलेल्या घरात चोरट्यांचा डल्ला, २५ तोळ्यांच्या सोन्याच्या बिस्किटांवर मारला हात

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ३१(वार्ताहर): शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत इंदिरानगर परिसरात एक धाडसी घरफोडी केली आहे. तब्बल नऊ दिवस बंद असलेल्या एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे १० लाख ५७ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि ऐवज लंपास केला आहे. ही धक्कादायक घटना शक्तीधाम अपार्टमेंट, महारुद्र कॉलनी येथे उघडकीस आली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात राजेंद्र भास्कर भाटे (वय ६१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र भाटे हे इंदिरानगर येथील शक्तीधाम अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ०३ मध्ये राहतात. ते कामानिमित्त दि. २१ जुलै रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अत्यंत चलाखीने घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच आणि लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडून त्यातील मौल्यवान ऐवजावर हात साफ केला.

चोरट्यांनी तब्बल ७ लाख ७० हजार रुपये किमतीचे २५ तोळे वजनाचे सोन्याचे बिस्किटे, ६० हजार रुपयांची दोन तोळ्यांची सोन्याची चेन, ३० हजारांचे ब्रेसलेट, एक लाख रुपयांच्या चार तोळ्यांच्या बांगड्या, तसेच कानातील लहान-मोठे दागिने आणि पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या अनेक वस्तू असा एकूण १० लाख ५७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

आज, दि. ३० रोजी सायंकाळी श्री. भाटे घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि कपाटातील सर्व सोने-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक एस. एस. फुंदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. तब्बल नऊ दिवसांच्या कालावधीत ही चोरी झाल्याने चोरट्यांना मोठा अवधी मिळाला. या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पुढील तपास पोउनि एस. एस. फुंदे करत आहेत.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!