नाशिक हादरलं! सिनेस्टाईल थरारक पाठलाग, परराज्यातील सराईत चैन स्नॅचर्स अखेर पोलिसांच्या जाळ्यात!**

इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी; मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या आरोपींकडून धक्कादायक कबुली.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ०९ (प्रतिनिधी):शहरात वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदिरानगर पोलिसांच्या धाडसी गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी एका सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून दोन परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या या चोरट्यांना पोलिसांनी वडाळागाव परिसरातून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एका गुन्ह्याची कबुली मिळाली आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना, वडाळागाव येथील मदिना लॉन्सजवळ त्यांना एक काळ्या रंगाची, विना नंबर प्लेटची मोटरसायकल संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. चालकाने हेल्मेट घातले होते, तर मागे बसलेल्या व्यक्तीने मास्क आणि टोपीने चेहरा लपवला होता. त्यांची संशयास्पद हालचाल पाहून पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला.

मात्र, पोलिसांना पाहताच या दोघांनी मोटरसायकल भरधाव वेगाने पळवायला सुरुवात केली. क्षणाचाही विलंब न लावता, गुन्हे शोध पथकाने आपल्या वाहनाने त्यांचा थरारक पाठलाग सुरू केला. फिल्मी दृश्याप्रमाणे सुरू असलेल्या या पाठलागात, चोरट्यांनी पोलिसांना चकवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अखेर रस्त्यावरील एका गतिरोधकावर चोरट्यांचा वेग कमी होताच, पोलिसांनी झडप घालून मोटरसायकल थांबवली. ते गाडी सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच, पोलिसांनी दोघांनाही शिताफीने पकडले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी आपली नावे मयुर दिनेश बजरंगे (वय ४०, रा. अहमदाबाद, गुजरात) आणि जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी असल्याचे सांगितले. चौकशीत त्यांनी दिनांक ०५/०८/२०२५ रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्याची कबुली दिली. आजही ते एकट्या महिलेला हेरून चैन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशानेच शहरात फिरत होते. परंतु, कोणताही गुन्हा करण्यापूर्वीच इंदिरानगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते गजाआड झाले.

आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहून पोलीसही चक्रावले!

ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपी १. मयुर दिनेश बजरंगे  २. जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी

 दाखल गुन्हे:

  कर्नाटक: हुबळी आणि गडग टाऊन पोलीस ठाण्यात दरोडा, चोरीचे गंभीर गुन्हे (कलम ३९५, १२०(ब), ३७९).

 महाराष्ट्र: अहिल्यानगर (अहमदनगर) येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दरोडा आणि जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचे गुन्हे (कलम ३९३, ३९५, ३४).

सदर आरोपींना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पुढील तपास करत आहेत.

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त श्री. किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड आणि प्रमोद कासुदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!