नाशिक हादरवण्याचा मोठा कट उधळला! सराफ दुकान लुटण्याआधीच ‘तो’ गजाआड; गुन्हे शाखा युनिट २ ची चित्त्याची झेप!

गनशॉपमधून सिनेस्टाईलने हिसकावलेल्या एअरगनचा वापर करण्यापूर्वीच पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २३ (विशेष प्रतिनिधी): नाशिक शहरातील एका मोठ्या सराफ दुकानावर दरोडा टाकून शहर हादरवण्याचा एका सराईताचा कट गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने उधळून लावला आहे. सराफी पेढी लुटण्याच्या उद्देशाने गनशॉपमधून बळजबरीने रिव्हॉल्वर एअरगन हिसकावून पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या. अंकुश गोविंद पारधी (वय २४) असे या धाडसी आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे शहरावरील एक मोठे संकट टळले आहे. पोलिसांच्या या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उपनगर परिसरातील प्रसिद्ध ‘बंदुक घर सिंग गन हाऊस’ येथे एक तरुण ग्राहक बनून आला. त्याने रिव्हॉल्वर एअरगन खरेदी करण्याचा बहाणा केला. दुकानदाराने त्याला एअरगन दाखवताच, त्या तरुणाने क्षणाचाही विलंब न लावता दुकानदाराच्या हातावर झटका देऊन रिव्हॉल्वर एअरगन हिसकावली आणि धूम ठोकली. या अनपेक्षित प्रकाराने दुकानदार हादरले. त्यांनी तात्काळ उपनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

शहरात अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर, घडलेली घटना अत्यंत गंभीर होती. गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी, सपोनि श्री. हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.

पथकाने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, त्याच्या हालचाली आणि पळून जाण्याचा मार्ग पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी आपले खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले.

तपास सुरू असतानाच, आज (दि. २२) गुन्हे शाखेचे श्रेणी पोउनि प्रेमचंद गांगुर्डे व पोअं संजय पोटींदे यांना त्यांच्या विश्वासू खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली. “एक तरुण, ग्रे रंगाचा टी-शर्ट घातलेला, मेट्रो मॉलकडून शिवाजीनगरकडे पायी येत असून त्याच्याकडे पिस्टल आहे,” अशी ती खबर होती.

एका क्षणाचाही विलंब न लावता, सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोउनि प्रेमचंद गांगुर्डे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. बातमीतील वर्णनानुसार, एक तरुण दिपनगर को-ऑप. सोसायटीजवळ येताच पोलिसांनी त्याला घेरले आणि शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून गनशॉपमधून चोरलेली रिव्हॉल्वर एअरगन, लॅपटॉप, मोबाईल फोन असा एकूण १,०१,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी अंकुश पारधी पोपटासारखा बोलू लागला. त्याने गनशॉपमध्ये बनावट आधारकार्ड देऊन एअरगन चोरल्याची कबुली दिली. ही एअरगन नाशिक शहरातील एका मोठ्या सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी चोरली होती, असा धक्कादायक खुलासा त्याने केला. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे एक मोठी दरोड्याची घटना टळली आणि शहरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ही चित्तथरारक कामगिरी मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोउनि प्रेमचंद गांगुर्डे, श्रेणी पोउपनिरी यशवंत बेंडकोळी, सपोउपनिरी विलास गांगुर्डे, पोहवा नितीन फुलमाळी, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, प्रकाश बोडके, मनोज परदेशी आणि पोअं संजय पोटींदे, प्रविण वानखेडे, महेश खांडबहाले, चापोअ जितेंद्र वजीरे, सुनिल खैरनार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.. 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!