नाशिक हादरले! नदीकिनारी तब्बल ३००० जिलेटीन कांड्या; CSR फंडाचे CCTV ठरले ‘तिसरा डोळा’, २४ तासांत छडा!

भंगार व्यावसायिक ते कंपनी प्रतिनिधी, सर्वांना बेड्या; मुंबईनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लाल 🚨 दिवा -नाशिक, दि. ०१ सप्टेंबर: शहरात सणासुदीच्या काळात मोठी खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. नंदिनी नदीच्या काठावर बेवारसपणे टाकून दिलेल्या तब्बल ३००७ मुदतबाह्य जिलेटीन कांड्यांच्या प्रकरणामुळे शहरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मुंबईनाका पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत या गंभीर प्रकरणाचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे, CSR फंडातून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने एका ‘छोटा हत्ती’ वाहनाचा माग काढून पोलिसांनी भंगार व्यावसायिक, कामगार ते स्फोटके पुरवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीपर्यंत सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या स्फोटकांची निष्काळजीपणे विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, एक मोठा घातपात टळला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी मुंबईनाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून दादासाहेब सभागृहाजवळ, नंदिनी नदीच्या निर्जन काठावर जिलेटीनसारखा स्फोटक पदार्थ टाकून दिल्याचा खबर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे जिलेटीनसदृश कांड्यांचा मोठा साठा पाहून त्यांना धक्काच बसला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. पथकाने केलेल्या तपासणीत या कांड्यांमध्ये ‘अमोनियम नायट्रेट’ हा स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न होताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. याप्रकरणी पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

CSR फंडाचे CCTV ठरले गेमचेंजर!

सणासुदीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे आदेश दिले. मात्र, घटनास्थळ निर्जन असल्याने थेट सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते. हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोउनि/समद बेग यांच्या पथकाने हार न मानता तपासकौशल्य वापरत परिसरातील येण्या-जाण्याच्या मार्गावरील CSR फंडातून बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी एक ‘छोटा हत्ती’ वाहन संशयास्पदरीत्या घटनास्थळावरून जाताना दिसून आले. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासचक्र फिरवले.

पोशि/आकाश सोनवणे आणि गणेश बोरणारे यांनी त्या ‘छोटा हत्ती’ वाहनाचा आणि चालक रिहान रफीक शेख याचा भद्रकाली परिसरातून शोध लावला. पोलिसी खाक्या दाखवताच रिहानने पोपटासारखी माहिती ओकली. भंगार व्यावसायिक जाकीर हनिफ अत्तार याने भंगार मालाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला भाडे दिल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार, त्याने आणि जाकीरचा कामगार दबीर अन्सारी याने मिळून त्या ३००७ जिलेटीन कांड्या नदीकिनारी फेकून दिल्या होत्या.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी भंगार व्यावसायिक जाकीर अत्तारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगितले की, ठाण्यातील कसारा येथील ‘SALVO EXPLOSIVES & CHEMICALS PVT. LTD.’ या कंपनीकडून त्याने भंगारात निघालेल्या एका ट्रकची ॲल्युमिनियम बॉडी खरेदी केली होती. ही बॉडी तोडत असताना त्याला आतमध्ये या जिलेटीन कांड्या सापडल्या. घाबरून त्याने त्या फेकून देण्यास सांगितले.

मूळ धागा समृद्धी महामार्गापर्यंत!

तपासाचे धागेदोरे कंपनीपर्यंत पोहोचताच पोलिसांनी कंपनीचा प्रतिनिधी अशोक कर्डक यालाही ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीने प्रकरणावरील पडदा दूर झाला. त्याने सांगितले की, समृद्धी महामार्गाच्या कामासाठी या जिलेटीन कांड्या वापरण्यात येत होत्या. त्यापैकी काही कांड्या ट्रकच्या एका लॉकमध्ये चुकून राहून गेल्या होत्या. नंतर ती संपूर्ण बॉडीच भंगारमध्ये विकण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणात कोणताही घातपाताचा उद्देश नसून, स्फोटकांसारख्या अत्यंत संवेदनशील वस्तूच्या हाताळणीत, साठवणुकीत आणि विल्हेवाटीत झालेला अक्षम्य निष्काळजीपणा उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली असून, फरार कामगार दबीर अन्सारी याचा शोध सुरू आहे.

सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!