एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया यशस्वी: हाय-प्रोफाईल घरफोडीचा गुन्हा उघड, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या.
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२६:- (प्रतिनिधी) :नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असताना, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर मुंबईनाका पोलिसांनी दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवायांमध्ये सराईत गुन्हेगारांना गजाआड करून जबरदस्त कामगिरी केली आहे. एका हाय-प्रोफाईल घरफोडीत फिर्यादीच्या भावजयीनेच ४६ लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे, तर दुसऱ्या कारवाईत दुचाकी चोरांच्या टोळीला पकडून त्यांच्याकडून सहा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुहेरी कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विश्वासाला तडा! भावजयच निघाली सूत्रधार
शहरातील उद्योजक मनोज काकरिया यांच्या घरी झालेल्या ६० लाखांच्या चोरीने खळबळ उडाली होती. काकरिया कुटुंब सुट्टीसाठी मुंबईला गेले असता, चोरांनी डाव साधला. विशेष म्हणजे, घरात कोणतीही तोडफोड न झाल्याने पोलिसांना हा गुन्हा ओळखीच्या व्यक्तीनेच केल्याचा दाट संशय होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, संशयाची सुई फिर्यादीच्या भावजयीकडे वळली.

मात्र, गेल्या चार महिन्यांपासून तिने आपले सर्व संपर्क तोडून स्वतःला लपवले होते, ज्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले. अखेर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांना गुप्त खबऱ्याकडून आरोपी मुंबईत येणार असल्याची पक्की खबर मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने मुंबईत सापळा रचून तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली.
तिने आपली मैत्रीण अमृता ठक्कर (रा. मुंबई) हिच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरात अथक प्रयत्न करून दुसऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींकडून तब्बल ५२ तोळे वजनाचे ४६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
वाहनचोर टोळीला मोठ्या शिताफीने पकडले
एकीकडे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच, दुसरीकडे मुंबईनाका पोलिसांच्या पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीवरही आपली नजर ठेवली होती. पोलीस अंमलदार गणेश बोरणारे व आकाश सोनवणे यांना चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी काही तरुण मदिना चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरून पथकाने मदिना चौकात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तीन तरुण एका मोटारसायकलवरून तिथे आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी नाशिक शहरातून आणखी सहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी करण म्हस्के (वय १९), दिपक अढागे (वय १८) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
या पथकाची कौतुकास्पद कामगिरी
पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त श्रीमती. मोनिका राउत आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष नरूटे आणि सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउनि. समद बेग, रोहीदास सोनार, देविदास गाढवे, योगेश अपसुंदे, समीर शेख, आकाश सोनवणे, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे, दिपक जगदाळे, श्रीकांत कर्पे, जुबेर सैय्यद, आणि महिला पोलीस अंमलदार भालेराव, नागरे, प्रेरणा शेळके, मोहिनी चव्हाण यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली
नाशिक शहर पोलिसांनी नागरिकांना “सुरक्षित रहा, सतर्क रहा” असे आवाहन केले आहे.







