आमदार हिरामण खोसकर, जिल्हा रुग्णालयात उदघाटन
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २३ : जिल्ह्यात मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम व्यापक स्वरूपात राबवावी. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
याअंतर्गत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते दुर्दृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मंगळवारी (ता. २२) जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान आमदार खोसकर यांनी मोतिबंदविरोधी मोहिमेच्या महत्वावर जोर दिला. जिल्हा चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील मोतिबिंदू असलेल्या व्यक्तींची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याची मोहीम २२ जुलै २०२५ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवण्यात येईल, ज्यायोगे गरजू रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध होतील. या मोहिमेच्या यशासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचा ठराव करण्यात आला आहे.
डॉ. शिंदे व डॉ. सतीशकुमार बोधडे यांनी मोतिबिंदूची लक्षणे आणि उपचारांवर सखोल माहिती दिली. या मोहिमेचे महत्व लक्षात घेतल्यास, ह्या विशेष शस्त्रक्रियांनी अनेकांचे जीवन अधिक उज्ज्वल होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात डॉ. शशिकांत आवारी आणि डॉ. राजश्री कुटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बोधडे यांनी केले, तर सूत्रसंचालन कविता पवार यांनी केले. आभार डॉ. कल्याणी अहिरे यांनी मानले.







