गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी; फरार मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे संकेत
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२ प्रतिनिधी:इंदिरानगर हादरवून सोडणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना आर्थिक रसद पुरवून आश्रय देणाऱ्या एका बड्या बिल्डरच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश आले आहे. किस्मत अली आजम अली अन्सारी (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून, या कारवाईमुळे गुन्हेगारीला संरक्षण देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या चतुराईच्या खेळीमुळे आता मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिनांक २५/०९/२०२५ रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत एक निर्घृण खुनाची घटना घडली होती. याप्रकरणी गयासउद्दीन उर्फ गॅस आणि हासीम वारसी हे मुख्य आरोपी घटनेपासून फरार होते. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हेगारी विश्वाचा कर्दनकाळ ठरलेले गुन्हे शाखेचे पथक या आरोपींच्या मागावर होते. मात्र, आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होते.
गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा कसून शोध घेत असताना, त्यांना पडद्याआड कोणीतरी मोठी मदत करत असल्याचा संशय बळावला होता. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ ने आपले खबऱ्यांचे जाळे अधिक सक्रिय केले. याच दरम्यान, पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर आणि चंद्रकांत गवळी यांना एक अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती मिळाली. माहितीनुसार, सिडकोतील एक बिल्डर किस्मत अली अन्सारी हा फरार आरोपींना केवळ पैसाच पुरवत नाही, तर त्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा आणि सर्वतोपरी मदत करत होता.
ही माहिती मिळताच सपोनि हेमंत तोडकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राणाप्रताप चौक परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचला. किस्मत अली येताच, आजूबाजूला काही कळण्याच्या आतच पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.
खुनाच्या गुन्ह्यानंतर आरोपींना पळून जाण्यासाठी आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी आपणच आर्थिक मदत केल्याची कबुली त्याने दिली. या धक्कादायक कबुलीमुळे गुन्ह्याच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. किस्मत अलीच्या अटकेमुळे आता मुख्य आरोपी गयासउद्दीन आणि हासीम वारसी यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी सोपे झाले आहे.
ही नेत्रदीपक कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त श्री. संदीप मिटके व श्री. शेखर देशमुख (अंबड विभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे आणि त्यांच्या शूर सहकाऱ्यांनी केली आहे. या कारवाईने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले असून, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांना कठोर संदेश मिळाला आहे.







