नाशिक पोलिसांच्या ‘ब्लॉकबस्टर’ कामगिरीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ – मयुर पवार! ५८ गुन्ह्यांचा डोंगर फोडणाऱ्या जवानावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांकडून कौतुकाचा वर्षाव; म्हणाले, “अशा वीरांमुळेच खाकीची शान जिवंत आहे!”

खाकीची ताकद: ५८ गुन्ह्यांचा उलगडा, ३० लाखांचे सोने हस्तगत; नाशिक पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव.

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२४:- खास प्रतिनिधी सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जगणाऱ्या नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या शौर्याची आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. पोलीस असल्याची बतावणी करून सामान्यांची लुट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचा अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तब्बल ३० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. या थरारक कारवाईमुळे तब्बल ५८ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, नाशिक पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाथर्डी फाटा ते ओझर: महामार्गावर थरार

दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार मयुर पवार यांच्या तीक्ष्ण नजरेने दोन संशयितांना पाथर्डी फाटा परिसरात हेरले. पोलिसांची नजर पडताच आरोपींनी धूम ठोकली. मात्र, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार असलेल्या पोलीस पथकाने हार मानली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी तातडीने अतिरिक्त कुमक पाठवली.

मुंबई-आग्रा महामार्गावर सुरू झालेला हा पाठलाग एखाद्या अॅक्शन पटाला साजेसा होता. सपोनि विलास पडोळकर, अंमलदार मयुर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत सुमारे ३० किलोमीटर अंतरापर्यंत आरोपींचा पाठलाग केला. अखेर ओझर येथील उड्डाणपुलावर पोलिसांनी आपले कसब पणाला लावत दोघांना घेरले. यावेळी आरोपींनी पोलिसांशी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण नाशिक पोलिसांच्या पोलादी बाहूंपुढे त्यांचे काहीच चालले नाही.

५८ गुन्ह्यांचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड

अटक करण्यात आलेले अमजदअली अकबर अली बेग (४७) आणि फैयाज इम्तियाज अन्सारी (२८) हे दोघेही भिवंडीचे रहिवासी असून, ते सराईत गुन्हेगार आहेत. तपासात त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ पासून त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून नाशिक शहरात ४२, ग्रामीणमध्ये १०, धुळ्यात ५ आणि कर्नाटकात १ असे एकूण ५८ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३० लाख रुपये किमतीचे २०१ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील गडग येथे पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणीही हे आरोपी ‘वॉन्टेड’ होते.

सीसीटीव्ही आणि मयुर पवार यांची ‘गरुड नजर’

या संपूर्ण कारवाईचा ‘हीरो’ ठरले ते पोलीस अंमलदार मयुर पवार. त्यांनी केवळ गस्तच घातली नाही, तर शेकडो सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. आरोपींची देहबोली, चालण्याची ढब, कपडे आणि वाहनांचा सखोल अभ्यास करून त्यांनी या गुन्हेगारांचा माग काढला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण तपासामुळेच हे मोठे यश पोलिसांच्या पदरी पडले आहे.

अशाच जवानांमुळे शहर सुरक्षित’

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत व त्यांच्या ‘टीम अंबड’ने केली.

या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जवानांचे कौतुक करताना म्हटले की,

“मयुर पवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदारांमुळेच नाशिक शहर सुरक्षित आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना समाजात अभिमानास्पद मान व प्रतिष्ठा मिळते.”

नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या या ‘रिअल हिरों’ना कडक सॅल्यूट केला जात आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!