नाशिक पुन्हा हादरले! बड्या राजकीय नेत्याचे महिला पदाधिकाऱ्यांना ‘आय लव्ह यू’चे मेसेज; पक्षप्रमुखांसमोरच ‘स्क्रीनशॉट’चा बॉम्बस्फोट!

टीसीएस, हनी ट्रॅप नंतर आता राजकीय ‘रोमिओ’ची चर्चा; तो बडा नेता कोण? शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२६:-(विशेष प्रतिनिधी) :हनी ट्रॅप आणि टीसीएसच्या काळ्याकुट्ट प्रकरणांमुळे आधीच बदनाम झालेल्या नाशिक शहरात आता आणखी एका भयंकर आणि तितक्याच खळबळजनक प्रकरणाची भर पडली आहे. राजकारणाचा बुरखा पांघरून सत्तेची ऊब घेणाऱ्या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्याचा ‘रोमिओ’ अवतार चव्हाट्यावर आला आहे. या महाशयांनी पदाचा गैरवापर करत चक्क स्वतःच्याच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांना ‘आय लव्ह यू’चे मेसेज पाठवल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच राजकीय भूकंप आला आहे!

पक्षप्रमुखांसमोरच फुटला भांडाफोड!

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नुकतेच या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा नाशिक शहराच्या दौऱ्यावर आले होते. याच संधीचा फायदा घेत संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षप्रमुखांची भेट घेतली आणि या ‘रंगील्या’ नेत्याचा बुरखा टराटरा फाडला. केवळ तोंडी तक्रार न करता, या धडाडीच्या महिलांनी थेट मोबाईलमधील ‘आय लव्ह यू’च्या मेसेजेसचे ‘स्क्रीनशॉट’च साहेबांच्या समोर ठेवले. हा पुरावा पाहून खुद्द पक्षप्रमुखांनाही घाम फुटल्याची चर्चा आहे. आता या वासनांध पदाधिकाऱ्याची तातडीने हकालपट्टी करा आणि कडक कारवाई करा, अशी आक्रमक मागणी महिलांनी लावून धरली आहे.

महिला कुठेच सुरक्षित नाहीत का?

या संतापजनक घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे सरकारी कार्यालयांतील महिला, खाजगी कंपन्यांमधील महिला आणि आता चक्क राजकीय पक्षांमधील महिला कार्यकर्त्याही असुरक्षित असल्याचे या भयानक वास्तव्यातून समोर आले आहे. ज्यांच्यावर समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे, तेच जर असे ‘लांडगे’ निघत असतील, तर दाद कोणाकडे मागायची? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

पोलीस खाक्या दाखवणार की प्रकरण दाबले जाणार?

सर्वसामान्य माणसाकडून एखादी साधी चूक झाली तरी कायद्याचा बडगा उगारणारी पोलीस यंत्रणा आता या राजकीय ‘दादा’च्या मुसक्या आवळणार का? याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे. की नेहमीच्या प्रथेप्रमाणे, पक्षाची इज्जत वाचवण्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि पोलीस मिळून हे संपूर्ण प्रकरणच ‘मॅनेज’ करणार, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या नाशिकच्या चौकाचौकात आणि चहाच्या टपरीवर फक्त एकच कुजबूज सुरू आहे… तो राजकीय पक्ष कोणता? आणि तो बडा पदाधिकारी कोण? याचे उत्तर लवकरच समोर येण्याची दाट शक्यता असून, अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!