• गुन्हे शाखा युनिट १ आणि २ चा धडक अॅक्शन प्लॅन; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलखान्यांचे मनसुबे उधळले!
• ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन मुख्य आरोपींना ठोकल्या बेड्या.
• विना चारा-पाणी क्रूरपणे बांधलेल्या मुक्या जनावरांना मिळाले जीवनदान.
लाल 🚨 दिवा-नाशिक,२८:-विशेष प्रतिनिधी, नाशिक:शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गोवंश कत्तलीचे मनसुबे रचणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची कडक अंमलबजावणी करत, गुन्हे शाखा युनिट १ आणि गुन्हे शाखा युनिट २ व इंदिरानगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या थरारक कारवायांमध्ये एकूण १२ गोवंश जनावरांची कत्तलीच्या दाढेतून सुटका केली आहे. या धडक कारवाईमुळे मुक्या जनावरांना जीवनदान मिळाले असून, नाशिककरांकडून खाकी वर्दीला कडक सॅल्युट ठोकला जात आहे!
कारवाई क्रमांक १: झाडाखाली बांधलेल्या दोन गायींची सुटका!
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या स्पष्ट सूचनांनुसार गुन्हे शाखा युनिट १ चे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी अंमलदार आप्पा पानवळ व राम बर्डे यांना गुप्त खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली की, वडाळा गावातील मैनु कोकणी याच्या गोठ्याजवळ दोन गायींना कत्तलीसाठी आणण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने क्षणाचाही विलंब न लावता थेट वडाळा गावात धडक दिली. गोठ्याच्या बाजूला एका झाडाखाली विना चारा-पाणी अतिशय क्रूरपणे बांधलेल्या दोन गायी पोलिसांना आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत शिताफीने आदिल कलीम कुरेशी (वय ३२, रा. बागवानपुरा) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत सांगितले की, ही जनावरे रेहान कुरेशी याने कत्तलीसाठी दिली होती. पोलिसांनी तात्काळ १ लाख रुपये किमतीच्या दोन गायींची सुटका करत त्यांना सुरक्षित गोशाळेत हलवले आणि आरोपीला इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
कारवाई क्रमांक २: ‘मामुज फार्म’वर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! १० गोवंशांची सुटका
दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत गुन्हे शाखा युनिट २ आणि इंदिरानगर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कामगिरी फत्ते केली. अंमलदार वाल्मिक चव्हाण व प्रवीण वानखेडे यांना ‘सेंट सादिक स्कूल’कडे जाणाऱ्या रस्त्यावरील ‘मामुज फार्म’च्या मोकळ्या प्लॉटमध्ये कत्तलीसाठी जनावरे आणल्याची टीप मिळाली होती.
सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि. मनोहर कारंडे यांनी तात्काळ एक संयुक्त फौज तयार केली आणि बाभळीच्या काटेरी झाडांमध्ये लपवून ठेवलेल्या जागेवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी २ गायी आणि ८ गोऱ्हे अशा एकूण १० गोवंशांची सुटका केली. घटनास्थळावरून आसिफ सुलतान कोकणी (वय ५२, रा. कोकणीपुरा) याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचा साथीदार गुलाम कोकणी याच्या सांगण्यावरून हे कृत्य होत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक!
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि इंदिरानगर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. पैशांच्या लालसेपोटी मुक्या जनावरांना विना चारा-पाणी क्रूरपणे डांबून ठेवणाऱ्या या प्रवृत्तीला पोलिसांनी वेळेतच ठेचले आहे. खाकी वर्दीच्या या संवेदनशील आणि कर्तव्यकठोर कामगिरीमुळे नाशिक शहरात सुरक्षिततेचा एक मोठा संदेश गेला असून, गोप्रेमी व नागरिकांकडून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






