‘लाल दिवा न्यूज’ने मांडलेल्या व्यथांची केंद्र सरकारकडून थेट दखल; हजारो कर व्यावसायिकांना प्रचंड दिलासा!
लाल 🚨 दिवा-दि.२६:-नवी दिल्ली/नाशिक, प्रतिनिधीकडून:“पोर्टलचा ‘सर्वर डाऊन’, व्यावसायिकांचा संयम ‘डाऊन’!” या मथळ्याखाली ‘लाल दिवा न्यूज‘ ने काही दिवसांपूर्वीच कर व्यावसायिकांच्या गंभीर समस्येला वाचा फोडली होती. सणासुदीच्या दिवसांत सरकारी पोर्टलच्या चक्रव्यूहात अडकून अहोरात्र काम करणाऱ्या हजारो सीए, कर व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या व्यथा आम्ही थेट सरकारच्या कानावर घातल्या होत्या. अखेर, आमच्या या पाठपुराव्याला आणि व्यावसायिकांच्या लढ्याला मोठे यश आले असून, केंद्र सरकारने टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
काय होता ‘लाल दिवा न्यूज’चा रिपोर्ट?
आम्ही आमच्या वृत्तात दाखवले होते की, एकीकडे नवरात्रीचा उत्साह सुरू असताना कर व्यावसायिक मात्र इन्कम टॅक्स पोर्टलच्या गोगलगाईच्या गतीमुळे प्रचंड तणावाखाली होते. AIS, TIS आणि 26AS डाउनलोड करण्यासाठी लागणारा तासन्तासांचा वेळ, वारंवार सर्व्हर डाऊन होणे आणि कामाचा प्रचंड डोंगर यांमुळे व्यावसायिकांचे मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आले होते. नाशिकचे ज्येष्ठ कर व्यावसायिक ॲड. प्रकाश विसपुते यांनी मांडलेला मुद्दा आम्ही ठळकपणे मांडला होता, ज्यात त्यांनी कमी उत्पन्न गटासाठी वेगळी मुदत देण्याची व्यवहार्य सूचना केली होती. आमच्या या वृत्तामुळे देशभरातील व्यावसायिक संघटना आणि करदात्यांमध्ये या समस्येवर जोरदार चर्चा सुरू झाली होती.
अखेर सरकार झुकले; परिपत्रक जारी!
‘लाल दिवा न्यूज’ च्या वृत्ताची आणि देशभरातून वाढत असलेल्या दबावाची दखल घेत, आज केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एक दिलासादायक परिपत्रक जारी केले.
परिपत्रक क्रमांक: १४/२०२५ (Circular No. 14/2025)
तारीख: २५ सप्टेंबर २०२५

या परिपत्रकानुसार, आयकर कायदा, १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, CBDT ने आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ वरून ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. या परिपत्रकावर भारत सरकारचे उपसचिव, डॉ. इंदू बाला यांची स्वाक्षरी आहे.
व्यावसायिक वर्गात आनंदाची लाट
या निर्णयानंतर व्यावसायिक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी ‘लाल दिवा न्यूज’चे आभार मानत म्हटले की, “तुमच्यामुळे आमचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचला आणि आम्हाला न्याय मिळाला.” आतापर्यंत रात्रीचा दिवस करून कुटुंबाला वेळ देऊ न शकलेले व्यावसायिक आता तणावमुक्त झाले आहेत. या निर्णयामुळे त्यांना कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, ते आपल्या कुटुंबासोबत निश्चिंतपणे दिवाळी साजरी करू शकतील.
एकंदरीत, ‘लाल दिवा न्यूज’ने उचललेला आवाज आणि व्यावसायिक संघटनांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. हा निर्णय केवळ तारिखवाढीचा नाही, तर देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यावसायिकांच्या श्रमाचा आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करणारा आहे.







