लाखोंच्या घरफोडीमागे ‘बाल’बुद्धी! अडीच लाखांच्या चोरीचा सूत्रधार निघाला अल्पवयीन!

भद्रकाली गुन्हे शोध पथकाची थरारक कामगिरी; अथक परिश्रमानंतर आरोपी जेरबंद

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.२४:-(प्रतिनिधी):शहराला हादरवून सोडणाऱ्या एका धाडसी घरफोडीचा उलगडा झाला असून, यामागे कुख्यात टोळी नव्हे, तर एक अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भद्रकाली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या विधी संघर्षित बालकाच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून तब्बल २ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २१ ऑगस्ट रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने लाखोंचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. शहरात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर, भद्रकाली पोलीस कामाला लागले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांचे जाळे वापरून पथकाने रात्रंदिवस एक केला. तपासादरम्यान मिळालेल्या एका लहानशा धाग्याने पोलिसांना थेट आरोपीपर्यंत पोहोचवले. मात्र, हा आरोपी सराईत गुन्हेगार नसून एक अल्पवयीन मुलगा आहे, हे कळताच पथकालाही धक्का बसला.

पथकाने सापळा रचून २३ ऑगस्ट रोजी वडाळा परिसरातून या विधी संघर्षित बालकाला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या मुलाने, पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व २,५३,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या यशस्वी कामगिरीमुळे नाशिक शहर पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहा. आयुक्त श्री. नितीन जाधव यांनी या कामगिरीबद्दल संपूर्ण गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख करत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!