पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचाराचा ‘पाझर’! दिंडोरीचा मोठा मासा एसीबीच्या गळाला.
लाल 🚨 दिवा नाशिक, दि. ९ ऑगस्ट: जल जीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतही भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिंडोरी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील वर्ग-१ पदावरील उपअभियंत्यासह एका कनिष्ठ अभियंत्याला तब्बल २ लाख १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे संपूर्ण शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
योगेश नारायण घारे (वय ४४, उपअभियंता, वर्ग-१) आणि मनीष कमलाकर जाधव (वय २९, कनिष्ठ अभियंता) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. शासकीय कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि जुन्या कामाचे “बक्षीस” म्हणून या दोघांनी ही लाच मागितली होती.
काय आहे नेमके प्रकरण ?यातील ३२ वर्षीय तक्रारदार हे एक शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम केले होते. या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात उपअभियंता योगेश घारे याने कंत्राटदाराकडे तब्बल २ लाख १६ हजार रुपयांची मागणी केली. या लाच मागणीला कनिष्ठ अभियंता मनीष जाधव यानेदेखील प्रोत्साहन दिले होते.
या जाचाला कंटाळून अखेर कंत्राटदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.अशी झाली कारवाई!आज, शुक्रवार, दिनांक ८ ऑगस्ट रोजी दिंडोरी पंचायत समिती कार्यालयातील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातच हा सापळा लावण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २ लाख १६ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने उपअभियंता योगेश घारे याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईने पंचायत समिती कार्यालयात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसीबीच्या पथकाने आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले असून, त्यांच्या घरांची झडतीही घेतली जात आहे, ज्यामुळे आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसीबीच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरीपोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आणि स्वप्नील राजपूत यांनी ही कारवाई यशस्वी केली. त्यांच्या पथकात पोलीस हवालदार संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, पोलीस नाईक किरण धुळे आणि चालक परशुराम जाधव यांचा समावेश होता.
लाचखोरांपासून सावध राहा! – एसीबीचे आवाहन कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक एसीबीने केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध आहे.







