- २३२ रक्षक, एक ध्येय…नाशिकची सुरक्षा!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१७:- शहर आणि ग्रामीण पोलिसांना २३२ नवीन गृहरक्षक जवानांची मोलाची भर पडली आहे. १८ दिवसांच्या कठोर प्रशिक्षणानंतर, हे तरुण रक्षक जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत. १७ जुलै २०२५ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या प्रशिक्षण समारोप सोहळ्यात त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि खांद्यावरील नवीन जबाबदारीचा भार स्पष्टपणे जाणवत होता.

शिबीर पोलीस मुख्यालयात गेले काही दिवस या जवानांच्या घामाचा आणि जिद्दीचा प्रत्यय येत होता. कायद्याची बारकावे, शस्त्र चालविण्याचे कसब, अचूक कवायत आणि नेहमी तत्पर राहण्याची तयारी, हे सारे त्यांनी आत्मसात केले. पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी ते आता पूर्णपणे सक्षम आहेत. या प्रशिक्षणासाठी पोलीस उपनिरीक्षक डॉ. अंचल मुदगल, रापोनि शंकर जांगवाड, रापोनि पंडित चव्हाण, नाशिक ग्रामीणचे रापोउपनि भाऊसाहेब धादवड, पोहवा व्ही.एस. हातेडीकर, पोहवा के. आर. पवार, पोहवा देशमुख, पोअं आर. एस. साळवे, मपोअं राधिका कुमावत आणि गृहरक्षक दलाचे कवायत निर्देशक चेतन गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

समारंभात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या नव्या दलाचे कौतुक केले. त्यांनी जवानांना प्रामाणिक आणि निष्ठावान राहण्याचा, शिस्तीचे पालन करण्याचा आणि नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी प्रशिक्षणात अव्वल कामगिरी करणारे सुरज सुद्रिक, आकाश ननावरे आणि राहुल वाडेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रत्येक जवानाच्या हातात प्रमाणपत्र आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.

या प्रशिक्षण समारोप समारंभास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक गृहरक्षक दल आदित्य मिरखेलकर, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ किशोर काळे आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके तसेच नाशिक शहर आणि ग्रामीणचे इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. नाशिकच्या सुरक्षेसाठी हे नवे रक्षक कटीबद्ध झाले आहेत, ही आश्वासक बाब आहे.







