खाकीचा ‘विद्युत’ झटका! अवैध धंद्यांवर नांगर फिरवला, गुन्हेगार भुईसपाट! पोलीस आले, अतिक्रमण गेले! पोलीस आणि मनपाच्या संयुक्त कारवाईने अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त.

धडाका! पोलीस आयुक्तांच्या ‘ॲक्शन मोड’ने गुन्हेगारांचे धाबे दणाणले; शहरात अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!

लाल 🚨 दिवा-दि.८:-नाशिक,शहरात गेल्या काही दिवसांपासून डोके वर काढणारी गुन्हेगारी आणि समाजकंटकांच्या उच्छादाने भयभीत झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत थेट रस्त्यावर उतरण्याचे आदेश देताच संपूर्ण पोलीस यंत्रणा जणू काही ‘चार्ज’ झाली. आयुक्तांच्या एका आदेशाने पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारांविरोधात अशी काही धडक मोहीम राबवली की, गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून शहराने मोकळा श्वास घेतला आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, टवाळखोर आणि दहशत निर्माण करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते.

आयुक्तांचा आदेश मिळताच पोलीस दलाने आपल्या खऱ्या ‘सिंघम’ अवतारात दर्शन दिले. पोलिसांनी विविध भागांमध्ये सराईत गुन्हेगारांची जाहीर धिंड काढली, ज्यामुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली. परिसरात दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना खाकीचा हिसका दाखवण्यात आला. या कारवाईमुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन पोलिसांचा दरारा पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे.

या मोहिमेचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाळा, महाविद्यालये आणि रेल्वे स्थानक परिसरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन. पोलिसांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला सोबत घेत शाळा-कॉलेजजवळच्या पान टपऱ्या, रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत हातगाड्या आणि उघड्यावर चालणाऱ्या दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या. जेसीबीच्या साहाय्याने ही अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली, ज्यामुळे पत्त्यांचे अड्डे आणि दारू पिणाऱ्यांचे अड्डे क्षणार्धात उद्ध्वस्त झाले.

पोलीस आणि मनपाच्या या संयुक्त ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे अनधिकृतपणे दारू विकणारे, जुगार खेळणारे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. “ही तर फक्त सुरुवात आहे, शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट होईपर्यंत ही कारवाई अविरत सुरूच राहील,” असा सज्जड दम पोलीस प्रशासनाने भरला आहे.

या धडक मोहिमेचे नेतृत्व नाशिकरोडचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, मनपाचे विभागीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी आणि ५० मनपा कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!