खड्ड्याने घेतला सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी; प्रशासनाच्या बेशरम निष्काळजीपणाने एका प्रामाणिक गुरुजीचा दुर्दैवी अंत!

अमृतधाम-तारवला नगर लिंक रोडवरील मृत्यूचा सापळा ठरला काळ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यादेखत थरार, पण नियतीपुढे प्रयत्न ठरले अपयशी

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१४:- प्रतिनिधी:शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे आता केवळ गैरसोयीचे नव्हे, तर मृत्यूचे सापळे बनले आहेत, याचा अत्यंत हृदयद्रावक प्रत्यय काल रात्री नाशिककरांना आला. एका सेवानिवृत्त आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षकाला प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. येवला येथील श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक, श्री दिनकर पांडुरंग झेटे (वय ६१), यांचा अमृतधाम-तारवला नगर लिंक रोडवरील एका मोठ्या खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शिक्षण वर्तुळात आणि नाशिक शहरात संतापाची लाट उसळली आहे.

काय घडले त्या रात्री?

श्री. दिनकर झेटे हे रात्री आपल्या ॲक्टिव्हा गाडीवरून मखमलाबाद येथील घराकडे निघाले होते. अमृतधाम-तारवला नगर लिंक रोडवरून प्रवास करत असताना, रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या आणि धोकादायक खड्ड्याचा त्यांना अंदाज आला नाही. काळोखात तो जीवघेणा खड्डा त्यांच्यासाठी ‘काळ’ बनून आला. त्यांची गाडी वेगात त्या खड्ड्यात आदळली आणि क्षणातच गाडीवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यावर डोक्यावर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागेवरच मोठा रक्तस्राव सुरू झाला.

देवदूतांचे प्रयत्न अयशस्वी…

योगायोगाने त्याचवेळी तिथून जाणारे व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल जोरे, मेजर निलेश पवार, मिलिंद परदेशी आणि चेतन दवनगे यांनी हा थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला. क्षणाचाही विलंब न लावता ते सर्वजण मदतीसाठी धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्री. झेटे यांना त्यांनी तातडीने उचलले आणि जवळच्या नामको रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले, पण डोक्याला झालेली जखम आणि अतिरिक्त रक्तस्राव यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रात्रभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. एका क्षणात एका शिक्षकाचा संसार उघड्यावर पडला.

 “हा अपघात नाही, प्रशासनाने केलेला खून आहे!” – प्रत्यक्षदर्शीचा संतप्त आरोप

या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आणि श्री. झेटे यांना रुग्णालयात दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते *राहुल जोरे* यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आमच्या डोळ्यादेखत गाडी खड्ड्यात आदळली आणि ते खाली कोसळले. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी धावपळ केली, पण उपयोग झाला नाही. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, तक्रारी केल्या, पण बेशरम प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आज एका प्रामाणिक माणसाचा जीव गेला. हा अपघात नसून, प्रशासनाच्या हलगर्जीपणाने केलेला हा एकप्रकारे खूनच आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे.”

परिसरात हळहळ आणि प्रशासनाविरोधात चीड

श्री. झेटे सर हे एक अत्यंत मनमिळाऊ आणि विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होते. त्यांच्या निधनाने अजिंक्यतारा शिक्षक प्रसारक मंडळ आणि शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

अजिंक्यतारा शिक्षक प्रसारक मंडळ, येवला संचलित श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक, श्री दिनकर पांडुरंग झेटे, यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शोकाकुल कुटुंबीय आणि आप्तेष्ट

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!