एकाच कारवाईत नाशिकरोड आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस, ९० हजारांच्या दोन मोटारसायकली जप्त
लाल 🚨 दिवा नाशिकरोड,दि.२३:- आमच्या प्रतिनिधीकडून :एका गुप्त खबऱ्याने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे नाशिकरोड पोलिसांनी सिन्नर फाटा परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचून एका सराईत मोटारसायकल चोराला सिनेस्टाइल पाठलाग करून जेरबंद केले आहे. गोकुळ संजय देवरे (वय २६) असे या चोराचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे मोटारसायकल चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ९० हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, शिंदेगाव येथील रहिवासी सुनील बोराडे यांची हिरो होंडा स्प्लेंडर (MH 15 CE 8042) १७ सप्टेंबर रोजी शिवाजी चौकातून चोरीला गेली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि गुन्हे शोध पथक चोराचा माग काढत होते. तपास सुरू असतानाच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत पक्की बातमी मिळाली की, संशयित चोर गोकुळ देवरे हा चोरीची मोटारसायकल घेऊन सिन्नर फाटा परिसरात येणार आहे.
माहिती मिळताच, श्री. सपकाळे यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार करून परिसराची नाकेबंदी केली. ठरलेल्या वेळी संशयित गोकुळ गाडीसह येताच पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्याने गाडीला वेग देत धूम ठोकली. पोलिसांनीही क्षणाचा विलंब न लावता त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतराच्या थरारक पाठलागानंतर अखेर पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले.
त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने केवळ नाशिकरोड येथील गुन्हाच नव्हे, तर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या बजाज प्लॅटिना (MH 15 EV 3308) गाडीचीही कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही गाड्या मिळून एकूण ९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही नेत्रदीपक कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सपोनि प्रवीण सूर्यवंशी, पोउनि संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे यांच्या पथकाने केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.







