खळबळजनक! नाशिक हादरलं!,फक्त मौजमजेसाठी मोबाईल हिसकावणारी ‘लुटारू’ टोळी गजाआड!

गुन्हे शाखेच्या जाळ्यात ३ सराईत चोरट्यांसह अल्पवयीन मुलगा; तब्बल १० लाखांचे २५ महागडे मोबाईल जप्त!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.६:- प्रतिनिधी:नाशिकच्या रस्त्यांवरून चालणेही मुश्किल झाले होते! क्षणात हातातील महागडा मोबाईल हिसकावून धूम ठोकणाऱ्या टोळीने शहरात अक्षरशः दहशत माजवली होती. पण आता या ‘टार्गेट गँग’च्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ला प्रचंड मोठे यश आले आहे. केवळ चैन आणि मौजमजेसाठी नागरिकांना लुटणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ही नाशिक पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

असा रचला थरारक सापळा

शहरात वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांनी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांची झोप उडवली होती. त्यांनी गुन्हे शाखेला या चोरट्यांना कोणत्याही परिस्थितीत जेरबंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. दिनांक १ ऑगस्ट रोजी रात्री गंगापूर रोडवर अविनाश आव्हाड यांचा ५० हजारांचा आयफोन हिसकावल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे चक्रव्यूह आणि खबऱ्यांकडून मिळालेली पक्की टीप या दुहेरी शस्त्राचा वापर केला. पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे आणि आप्पा पानवळ यांना या गुन्ह्यामागे विकी काळे, ऋतिक हिरे आणि शुभम इंगळे या त्रिकुटाचा हात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. हे तिघे चोरलेला माल विकण्यासाठी चांदशी परिसरात येणार असल्याचे कळताच, पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचला. जसे संशयित मोपेडवरून (क्र. एम.एच ०१-ई.एच-९६५४) आले, तसे दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालून तिघांनाही जागीच उचलले!

चौकशीत धक्कादायक खुलासा: चोरी फक्त ‘मौजमजे’साठी !

पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी दिलेला कबुलीजबाब ऐकून पोलीसही चक्रावले! कोणत्याही आर्थिक गरजेपोटी नव्हे, तर केवळ महागडी चैन आणि मौजमजेसाठी आपण हा गुन्हा करत असल्याचे त्यांनी निर्लज्जपणे कबूल केले. कॉलेज रोड, गंगापूर रोड, सातपूर अशा वर्दळीच्या ठिकाणी हे आरोपी पायी जाणाऱ्यांना लक्ष्य करत आणि क्षणात मोबाईल हिसकावून पसार होत असत. धक्कादायक बाब म्हणजे, चोरी केलेले हे महागडे मोबाईल ते सातपूर येथील एका अल्पवयीन मुलामार्फत विकत असत. पोलिसांनी तात्काळ त्या मुलालाही ताब्यात घेतले.

जप्त मुद्देमालाचा डोंगर !

या टोळीकडून पोलिसांनी अक्षरशः मोबाईलचा खजिना जप्त केला आहे.एकूण जप्त मोबाईल: २५ किंमत: १०,२५,००० रुपयेगुन्ह्यात वापरलेली मोपेड: १ प्रमुख ब्रँड्स: आयफोन (१३, १४, १५), सॅमसंग, वन प्लस, विवो, रेडमी या कारवाईमुळे गंगापूर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे तर उघड झालेच, पण शहरातील इतर अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, उप-आयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहा. आयुक्त श्री. संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखा युनिट १ च्या संपूर्ण टीमने ही धाडसी कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!