मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शिफारस पत्राचा वापर करून फसवणूक? पोलीस दलात खळबळ
लाल 🚨 दिवा-नाशिक,२०:– राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात भूकंप घडवून आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा आणि त्यांच्या सही-शिक्क्याच्या शिफारस पत्राचा वापर करून, त्यांच्याच एका निकटवर्तीयाने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला इच्छित ठिकाणी बदली करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १२ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयापासून ते पोलीस मुख्यालयापर्यंत मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्ह्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या कौटुंबिक कारणास्तव सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, त्यांची ओळख मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणवणाऱ्या एका व्यक्तीशी झाली. या व्यक्तीने, “साहेब (मंत्री महाजन) आणि माझे जवळचे संबंध आहेत, तुमची बदली मी चुटकीसरशी करून देतो,” असे आश्वासन दिले.
आपले वजन किती आहे हे दाखवण्यासाठी, या भामट्याने पीडित पोलीस अधिकाऱ्याला मंत्री महाजन यांच्या सही आणि लेटरहेड असलेले एक शिफारस पत्र दाखवले. (या बातमीसोबत जोडलेले पत्र हे त्याच स्वरूपाचे असल्याचे बोलले जात आहे). या पत्रात एका महिला पोलीस अधिकाऱ्याची पती-पत्नी एकत्रीकरण योजनेंतर्गत बदली करण्याची शिफारस थेट मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. अशा प्रकारची अनेक कामे आपण केल्याचे भासवून त्याने पीडित अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला.
विश्वास बसल्यानंतर, या कामासाठी ‘वरच्या स्तरावर’ 30 लाख द्यावे लागतील, असे कारण सांगून त्याने टप्प्याटप्प्याने एकूण १२ लाख घेतले. बदलीच्या आशेने पीडित अधिकाऱ्याने ही रक्कम त्याला दिली. मात्र, अनेक महिने उलटूनही बदलीचा आदेश न निघाल्याने अधिकाऱ्याला संशय आला. त्यांनी जेव्हा त्या निकटवर्तीयाकडे पैशासाठी आणि बदलीसाठी तगादा लावला, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि नंतर आपला फोन बंद करून तो गायब झाला.
पोलीस दलात मोठी खळबळ
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात या भामट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मंत्र्यांच्या नावाचा वापर करून थेट पोलीस अधिकाऱ्यालाच गंडवल्याने पोलीस दलातही एकच खळबळ उडाली आहे. बदल्यांसाठी चालणाऱ्या आर्थिक रॅकेटचा हा भाग आहे का ? याचा तपास होणे आवश्यक आहे.
बॉक्स: पत्रात काय आहे?
समोर आलेल्या शिफारस पत्रात, मंत्री गिरीश महाजन यांनी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस अधिकारी यांची पती-पत्नी एकत्रीकरण योजनेंतर्गत बदली करण्याची शिफारस माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अशाच प्रकारची खरी पत्रे दाखवून आरोपीने पीडित अधिकाऱ्याला जाळ्यात ओढले असावे, असा पोलिसांना संशय आहे.
मंत्री कार्यालयाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. मात्र, या प्रकरणामुळे विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी एक आयते कोलीत मिळाले आहे. या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे आणि यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, हे तपासातच उघड होईल.







