लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२४:-(विशेष प्रतिनिधी):शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे! नाशिकच्या आडगाव पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवत, एका सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. खाकी वर्दीचा दबदबा आणि पोलिसांच्या अचूक गुप्तचर यंत्रणेमुळे तब्बल ४ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला घवघवीत यश आले आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात आडगाव पोलिसांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे.
दिनांक २२ एप्रिल रोजी आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेहमीप्रमाणे पोलिसांची गस्त सुरू होती. डोळ्यांत तेल घालून शहराचे रक्षण करणारे पोलीस हवालदार मनोज परदेशी, अक्षय गोसावी, भुजबळ आणि लिलके हे पेट्रोलिंग करत असताना, परदेशी आणि गोसावी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची टीप मिळाली. एक संशयित इसम धात्रक फाटा येथे चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची ती खात्रीशीर माहिती होती.
क्षणभरही विलंब न लावता, आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धात्रक फाटा परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचला. काही वेळातच तिथे एक संशयित इसम आला, ज्याच्या मोपेड दुचाकीवर चुकीचा नंबर टाकलेला होता. पोलिसांच्या करड्या नजरेतून तो सुटणे शक्यच नव्हते! पोलिसांनी तात्काळ झडप घालत त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले.
मेकॅनिकच निघाला मास्टरमाईंड चोरटा !
पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपीने पोपटासारखी माहिती देण्यास सुरुवात केली. शेख हसन शेख इकबाल (वय २७, मूळ रा. इस्लामपूर, मालेगाव आणि सध्या रा. अंबड लिंक रोड, नाशिक) असे या भामट्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हा चोरटा व्यवसायाने ‘मोटारसायकल फिटर’ आहे! आपल्या याच कौशल्याचा गैरवापर करून तो अतिशय शिताफीने दुचाकी चोरत असे.
आडगाव पोलिसांच्या कसून चौकशीत या मास्टरमाईंडने आडगाव, सातपूर तसेच नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून चोरलेल्या तब्बल ९ दुचाकींची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून टीव्हीएस ज्युपिटर, होंडा शाईन, युनिकॉर्न, बजाज पल्सर, सुझुकी ऍक्सेस, हिरो स्पेलंडर आणि पॅशन प्रो अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या तब्बल ४,०५,०००/- रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे आडगाव आणि सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले असून, इतर गाड्यांचे रहस्यही लवकरच उलगडणार आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १) श्रीमती मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) श्री. शेखर देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील यांच्या अचूक नियोजनानुसार, सपोनि निखील बोंडे, पोउनि विकास पंचमुख यांच्यासह पोहवा मनोज परदेशी, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, इमरान शेख, देसाई, अहिरे, वैशाली बच्छाव, दिपाली शार्दुल, अक्षय गोसावी, दिपक भुजबळ, रविंद्र लिलके, नंदु साळुंखे, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, कुंदन भाबड आणि अमित पवार या धाडसी पोलीस अंमलदारांनी ही अतुलनीय कामगिरी बजावली आहे.
आडगाव पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि धडक कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारांच्या गोटात मात्र दहशत पसरली आहे!






