काळोख्या रात्री कोयत्याचा थरार! नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले.!, गोरगरिबांच्या पैशांवर नजर! महिला बचत गटांना लुटणारे नराधम पोलिसांच्या ताब्यात.

पेट्रोल पंपावर कोयत्याने वार, बचत गटांना रस्त्यात मार! सराईत त्रिकुट अखेर जेरबंद.

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२६:- प्रतिनिधी: वाडीवऱ्हे, घोटी आणि हरसुल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः teror निर्माण करणाऱ्या एका सराईत टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. काळोख्या रात्री पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पैशांची बॅग लुटणे, तसेच दुर्गम भागात गोरगरीब महिलांच्या बचत गटाचे पैसे जमा करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना लक्ष करून लुटमार करणे, अशा एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत या ‘कोयता गँग’ला जेरबंद केले असून, त्यांच्या अटकेमुळे जबरी चोरीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

काय होता रक्तरंजित थरार ?

या प्रकरणाची ताजी घटना दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरंबी शिवारात घडली. शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन नराधमांनी पंपावरील कामगारावर काही कळायच्या आत कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कामगाराच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून हे दोघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी असे फिरवले तपासाचे चक्र !

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले आरोपींचे वर्णन, त्यांची देहबोली, त्यांची विशिष्ट बोलीभाषा आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर गाडी यावरून पोलिसांनी आपले गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. लवकरच, या गुन्ह्यातील आरोपी हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दत्तु प्रकाश महाले (वय १९, रा. गणेशगाव, त्र्यंबकेश्वर) आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि त्यांनीच पेट्रोल पंपावर कोयत्याने हल्ला करून लूटमार केल्याची कबुली दिली.

बचत गटांचे पैसे लुटणारेही तेच !

पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी या आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने यापूर्वीही अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. घोटीजवळील वैतरणा डॅम परिसरात आणि हरसुलच्या घनशेत घाटात, दुर्गम भागातून महिला बचत गटांचे हप्त्याचे पैसे गोळा करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करून, त्यांना अडवून बेदम मारहाण केल्याचे व त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावल्याचे त्यांनी कबूल केले. या माहितीवरून पोलिसांनी त्यांचा तिसरा साथीदार गणेश बाळु वाघ (वय २६, रा. आळवंड, त्र्यंबकेश्वर) यालाही बेड्या ठोकल्या.

या टोळीच्या अटकेमुळे वाडीवऱ्हे, घोटी आणि हरसुल पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे.

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर ,पोउनि प्रकाश भालेराव, पोउनि सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार प्रविण काकड, संतोष दोंदे, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, नवनाथ शिरोळे, मयुर कांगणे, विकास गिते, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदिप नागपुरे ,आणि त्यांच्या धाडसी पथकाने केली आहे. या टोळीच्या अटकेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!