थेट पाण्यात उतरून पाहणी; अधिकाऱ्यांची झाडाझडती, नागरिकांना दिला मदतीचा विश्वास
लाल 🚨 दिवा-नाशिक/येवला, दि. २८ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्याला अधिकृत पालकमंत्री कोण, याची चर्चा सुरू असतानाच, आज येवला आणि निफाडच्या पूरग्रस्त जनतेने आपला खरा ‘पालक’ कोण हे अनुभवले! ढगफुटीसदृश पावसाने थैमान घालून होत्याचे नव्हते केले असताना, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ थेट पाण्यात आणि चिखलात उतरले. त्यांनी केवळ पाहणी दौरा न करता, पूरग्रस्तांच्या अश्रू पुसले आणि “शासन तुमच्या पाठीशी आहे, एकही कुटुंब मदतीविना राहणार नाही!” असा खणखणीत दिलासा दिला.
गेल्या २४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाने जिल्ह्यात जणू प्रलयच आणला आहे. नद्या-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले असून, येवला तालुक्यातील अंदरसुल येथे कोळगंगा नदीचे पाणी थेट नागरी वस्तीत घुसले. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. ही विदारक माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून, त्यांनी स्वतः गुडघाभर पाण्यात उतरून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या या कृतीने उपस्थित अधिकारीही अवाक् झाले.
“आधी जीव वाचवा, पंचनामे नंतर!” – भुजबळांचे खडे बोल
भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत त्यांना चांगलेच धारेवर धरले. “पूरग्रस्त भागातील प्रत्येक नागरिकाला आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हे आपले पहिले काम आहे. लोकांचे जीव वाचवणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंचनामे आणि कागदी घोडे नंतर नाचवा,” अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. त्यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ३ किलो डाळ वाटप करण्याचे आदेश दिले. तसेच, आवश्यकतेनुसार निवारा छावण्या उभारून नागरिकांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या.
जिथे संकट, तिथे भुजबळ!
अंदरसुलनंतर भुजबळ यांनी येवला शहरातील हुडको कॉलनी, सावरगाव, पाटोदा येथील शॉपिंग सेंटर तसेच निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर अशा सर्वच नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्यांनी स्वतः नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करून त्यांच्या पाठीवर विश्वासाची थाप दिली. यावेळी त्यांनी पोलीस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिले.

भुजबळ यांच्या या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून मदतकार्याला प्रचंड वेग आला आहे. अधिकृत पालकमंत्री नसतानाही भुजबळ यांनी दाखवलेली तत्परता आणि लोकांप्रति असलेली तळमळ पाहून, “आमचे पालकमंत्री हेच आहेत,” अशी भावना पूरग्रस्त नागरिक बोलून दाखवत होते.
या दौऱ्यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विशाल नाईकवाडी यांच्यासह ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, दिलीप खैरे, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







