मुख्यमंत्र्यांचा ‘हात’ आणि समाजाची ‘साथ’; वाशिमच्या चिमुकलीला मृत्यूच्या दारातून खेचून आणले!
लाल 🚨 दिवा-मुंबई,दि.१८:- प्रतिनिधीमातृप्रेमापुढे नियतीलाही झुकावे लागते, याचा प्रत्यय देणारी एक अविश्वसनीय आणि हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील एका भाजी विक्रेत्याच्या ७ वर्षीय मुलीसाठी स्वतःच्या यकृताचा तुकडा देत एका आईने तिला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः बाहेर काढले आहे. २० लाखांच्या खर्चाचा डोंगर समोर असताना, मुख्यमंत्री सहायता निधी आणि समाजाच्या मदतीने हा चमत्कार घडला असून, या घटनेने आईच्या त्यागाची आणि सामाजिक एकजुटीची एक नवी मिसाल प्रस्थापित केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथील रहिवासी रवींद्र गावंडे यांचा भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय. पत्नी मीनाक्षी आणि सात वर्षांची मुलगी देवांशी यांच्यासोबत त्यांचा छोटासा संसार सुरू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून देवांशीच्या नशिबी आजारपणाचे शुक्लकाष्ठ लागले होते. सततची पोटदुखी, ताप आणि मळमळ यामुळे ती खंगून गेली होती. गावंडे कुटुंबाने मंगरूळपीर ते अकोला आणि अखेर नागपूरपर्यंत उपचारासाठी धावपळ केली. नागपूरमध्ये डॉक्टरांनी तपासणीअंती जो निष्कर्ष सांगितला, त्याने गावंडे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. देवांशीचे यकृत (लिव्हर) गंभीररीत्या निकामी झाले होते आणि ‘यकृत प्रत्यारोपण’ हाच एकमेव पर्याय उरला होता.
या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २० लाख रुपयांचा खर्च येणार होता. भाजीपाला विकून कसेबसे घर चालवणाऱ्या रवींद्र यांच्यासाठी ही रक्कम आभाळाएवढी होती. पोटच्या मुलीला डोळ्यासमोर मृत्यूच्या खाईत जाताना पाहण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. अशा या अंधारातच त्यांना एका मित्राकडून ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ या आशेच्या किरणाबद्दल माहिती मिळाली.
कोणताही वेळ न दवडता रवींद्र यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. त्याचवेळी त्यांनी समाज माध्यमांवरूनही मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या हाकेला शासनासोबतच समाजानेही मोठा प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराच्या खर्चाचा मोठा वाटा उचलण्यात आला. उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी गावकरी आणि अनेक सामाजिक संस्था देवदूतासारख्या धावून आल्या.
पैशांची जुळवाजुळव होत असताना, देवांशीसाठी सर्वात मोठा प्रश्न होता तो यकृतदात्याचा. अशावेळी तिची आई, मीनाक्षी गावंडे, हिमालयासारखी तिच्या पाठीशी उभी राहिली. आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या यकृताचा भाग देण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये ७ जुलै रोजी डॉक्टरांच्या पथकाने ही गुंतागुंतीची पण यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. आईने दिलेल्या यकृताच्या भागाने देवांशीला जणू नवे आयुष्यच दिले.
“आमची लेक वाचणार नाही असं वाटलं होतं. पण मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्टमुळे आज ती आमच्या डोळ्यासमोर हसतेय. आमच्यासाठी हेच सर्वस्व आहे. ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू,” असे सांगताना देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांचे डोळे पाणावले होते.
“प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत वेळेवर मदत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. देवांशीच्या निमित्ताने आम्ही एका कुटुंबाला त्यांचा आनंद परत देऊ शकलो, याचे आम्हाला समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
सध्या देवांशीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मीनाक्षी यांच्या मातृत्वाने आणि समाजाच्या दातृत्वाने एका कोवळ्या जीवाला नवसंजीवनी दिली आहे, हे निश्चित.







