प्रभाग १८ मध्ये राजकीय भूकंप! आखाड्यातील राष्ट्रीय पैलवान आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

शिवसेनेचे निष्ठावंत प्रवीण खैरनार यांचे सुपुत्र, युवा नेतृत्व म्हणून चर्चेला उधाण; ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास समीकरणे बदलणार.

लाल 🚨 दिवा-मोहाडी,दि.३०:- प्रतिनिधी:येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहाडी आणि अवधान परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारे, उत्तर महाराष्ट्र चॅम्पियन आणि राष्ट्रीय रजत पदक विजेते पैलवान विनय भाऊ खैरनार हे आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून प्रभाग १८ साठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने अनेक प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.

विनय खैरनार हे केवळ एक पैलवान नाहीत, तर त्यांना शिवसेनेच्या निष्ठेचा आणि संघर्षाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील, शिवसेनेचे कट्टर समर्थक आप्पासाहेब प्रवीण भाऊ खैरनार यांनी २००२ साली मोहाडी आणि अवधानमध्ये शिवसेनेचे वार्ता फलक सुरू करून घराघरात भगवा पोहोचवला होता. त्यांनी स्वतः महापालिका निवडणूक लढवून पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. वडिलांच्या याच राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा घेऊन विनय भाऊ राजकारणात सक्रिय होण्यास उत्सुक आहेत.

तरुण चेहरा, कोरी पाटी !

सध्याच्या राजकारणात जिथे अनेक उमेदवारांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत असतात, तिथे विनय खैरनार यांची ‘कोरी पाटी’ आणि ‘स्वच्छ प्रतिमा’ ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जात आहे. खिलाडूवृत्ती, तरुणांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता आणि कोणत्याही राजकीय वादापासून दूर असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळेच युवा सेनेकडूनही त्यांच्या नावाला विशेष पसंती मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रभाग १८ मधून लढण्याची इच्छा

पैलवान विनय खैरनार यांनी समाजातील विविध कार्यक्रमांमधून आणि आपल्या निकटवर्तीयांकडे प्रभाग १८ मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या इच्छेमुळे प्रभागातील तरुणांमध्ये आणि शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. जर ठाकरे गटाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर प्रभाग १८ मधील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरेल, यात शंका नाही. एका पैलवानाच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे प्रभागातील सर्व राजकीय समीकरणे बदलून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!